... तर वाईतून मदन भोसलेंची उमेदवारी निश्‍चित : चंद्रकांत पाटील 

..
Madan bhosale
Madan bhosale

वाई : विरोधकांनी काहीही वल्गना केल्या तरी विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना व मित्रपक्षांची महायुती कायम आहे. युतीच्या जागावाटपात वाई मतदासंघ भाजपाला मिळावा म्हणून आम्ही प्रयत्नशील असून येथून मदन भोसले यांची उमेदवारी निश्‍चित आहे.

त्यामुळे त्यांच्या विजयाचे भाकित सांगण्यासाठी कोणा भविष्यकाराची गरज नाही, असे स्पष्ट मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. 

वाईतील येथील धनश्री मंगल कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या बूथ व शक्ती केंद्र प्रमुखांच्या विजय संकल्प संमेलनात ते बोलत होते. यावेळी किसन वीर उद्योग समुहाचे अध्यक्ष मदन भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, राज्य सहकारी संस्थेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर उपस्थित होते. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोणी असो युती हाच पक्ष मानून कार्यकर्त्यांनी महायुतीचा उमेदवार विजयी होण्यासाठी एकदिलाने झटून काम करावे. केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने सामान्य लोकांच्या व देशाच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय व योजना हाती घेतल्या आहेत. त्यांची माहिती प्रत्येक बुथमधील मतदारांपर्यंत पोहचविण्याचे काम शक्ती प्रमुख व बुथप्रमुखांनी करावे.

भाजपाने दिलेले शब्द पुर्ण केल्यानेच विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना, आरपीआय, व मित्रपक्षाच्या महायुतीचीच राज्यात पुन्हा सत्ता येईल, याची खात्री विरोधकांना असल्याने आज अनेक नेत्यांची पक्ष प्रवेशासाठी पळापळ सुरू आहे. 

मदन भोसले म्हणाले, राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येण्यासाठी भाजपाने केलेल्या संकल्पाची पुर्ती करणे आपले कर्तव्य आहे. उमेदवारी कोणालाही दिली तरी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रत्येकजण झटून काम करेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

यावेळी वाई (22), खंडाळा (107) व महाबळेश्‍वर (85) तालुक्‍यातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com