चंद्रकांत पाटलांचे सचिव जाधव यांना मुदतवाढ?  - Chandrakant Patil PA's term extended? | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांत पाटलांचे सचिव जाधव यांना मुदतवाढ? 

तुषार खरात 
शुक्रवार, 19 मे 2017

महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे खासगी सचिव श्रीनिवास जाधव या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार आहेत. पण त्यांना कदाचित मुदतवाढ मिळू शकेल, अशी चर्चा मंत्रालयात आहे. 

मुंबई : महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे खासगी सचिव श्रीनिवास जाधव या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार आहेत. पण त्यांना कदाचित मुदतवाढ मिळू शकेल, अशी चर्चा मंत्रालयात आहे. 

चंद्रकांत दादा मंत्रिपदावर आल्यापासून गेली अडीच वर्षे जाधव त्यांचे खासगी सचिव म्हणून कार्यरत आहेत. दादा आणि जाधव यांचे खूपच चांगले "ट्युनिंग" जुळले आहे. त्यामुळेच जाधव यांना मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

वास्तविक, जाधव यांची मूळ नियुक्ती एस.टी. महामंडळामधील आहे. पण 15 वर्षांपूर्वी तत्कालीन सहकारमंत्री बाबासाहेब कुपेकर यांच्याकडे ते खासगी सचिव म्हणून रुजू झाले होते. कुपेकर आणि जाधव यांची जोडी चांगलीच जमली. नंतर कुपेकर यांची नियुक्ती विधानसभेच्या अध्यक्षपदी झाली. पण कुपेकर यांना काहीही करून जाधव हवेच होते. त्यासाठी त्यांनी "विशेष कार्य अधिकारी" म्हणून जाधव यांना "उसनवारी" तत्त्वावर घेतले. पण महामंडळातून विधानभवनात पाठवायला तेव्हा वित्त विभागाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही श्रीनिवास जाधव यांच्या या नियुक्तीला विरोध केला. पण कुपेकर इरेला पेटले. काहीही करून जाधव त्यांना हवेच होते. त्यामुळे नाइलाजाने मुख्यमंत्री देशमुख यांनी जाधव यांना विधिमंडळात पाठवायला होकार दिला. तेव्हापासून ते विधिमंडळातच कार्यरत होते. 

अडीच वर्षांपूर्वी मात्र चंद्रकांतदादांचे खासगी सचिव म्हणून सूत्रे हाती घेण्यापूर्वी जाधव विधिमंडळ अस्थापनेवरूनच मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर आल्याचे सूत्रांनी सांगितले. आता वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्यामुळे ते निवृत्त होणार आहेत. पण ते निवृत्ती स्वीकारतील की मुदतवाढीच्या फंदात पडतील याकडे मंत्रालयाचेही लक्ष लागले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख