आम्ही मते वळवली असती तर महाडिक खासदार झाले असते!

सध्या विधानसभा निवडणूकीचं वातावरण तापू लागल आहे. 15 ते 20 सप्टेंबरच्या दरम्यान आचारसंहिता लागू होईल आणि 13 ते 17 ऑक्‍टोबर दरम्यान निवडणूका लागतील. ही निवडणूक महायुती एकत्रच लढणार आहे आणि 220 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला असल्याचे श्री. पाटील म्हणाले.
आम्ही मते वळवली असती तर महाडिक खासदार झाले असते!

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत भाजपा-सेना युती होती. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाची अडीच लाख मते आहेत. आम्ही प्रामाणिकपणे युती धर्माचे पालन केले म्हणून शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक खासदार झाले. हे त्यांच्यासह इतरांनी विसरू नये, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज लगावला. 

प्रा. मंडलिक यांच्या विजयाचे श्रेय "आमचं ठरलंय' म्हणणाऱ्यांनीही घेऊ नये, असाही टोला त्यांनी कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे नांव न घेता लगावला.

महापुराच्या काळात रात्रदिवस काम करणाऱ्या मुकुंद गावडे, पी. डी. पाटील, हेमंत कोळेकर, नामदेव पाटील, कर्णसिंह घाटगे, दिपक शिरगांवे, बाळासाहेब यादव आदिंचा सत्कार श्री. पाटील यांच्या हस्ते आज झाला. हॉटेल अयोध्या येथे झालेल्या या कार्यक्रमातच भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. पाटील बोलत होते.

ते म्हणाले,"धनंजय महाडिक यांच्या भाजपा प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे. यापुढील सर्व निवडणुका महाडिक गटाला हाताशी धरूनच लढवल्या जातील. महायुतीच्या धर्माचं पालन आम्ही केले म्हणूनच तुम्ही खासदार बनला, हे प्रा. संजय मंडलिक यांनी विसरू नये. त्यामुळे "आमचं ठरलंय' म्हणणाऱ्यांनी याचे श्रेय घेऊन प्रा. मंडलिक यांची मदत मागू नये.'

आई अंबाबाईच्या कृपेने श्री. महाडिक यांना दिल्लीशी निगडीत एखादे पद मिळेल. त्यांना खासदार व्हावे असे वाटले तर तेही करू आणि दुसऱ्यांदा त्यांचा सत्कार करण्याची संधीही लवकरच मिळेल. महाडिक यांच्या जिल्ह्यातील ताकदीचा वापर करून महायुती दहाही जागा जिंकेल, या निवडणुकीसाठी भाजपा-सेना युतीची निश्‍चित युती होईल, असा विश्‍वास श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमात मुकूंद गावडे, अशोक देसाई, बाबा देसाई यांनी जिल्हयात पक्षाच्या वतीने महापुरात केलेल्या मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. संकटांना धैर्यानं कसं तोंड द्यायचं, याचा धडा श्री. पाटील यांनी घालून दिल्याचे अनेकांनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री भरमूण्णा पाटील, गोपाळराव पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक पी. जी. शिंदे, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
 
मुश्रीफ, सतेज यांना आडवे करणार
कॉंग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन परस्पर भुमिका जाहीर करणाऱ्या खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यावर पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सडकून टीका केली. पालकमंत्री पाटील यांनी कार्यकर्त्यांची भक्कम मोट बांधल्यानंच मंडलिक लोकसभेत विजयी झाले, हे त्यांनी विसरू नये, असा टोला लगावला. विधानसभा निवडणुकीत आमदार सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांना आडवं केल्याशिवाय रहाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
 
तर महाडिकच खासदार असते
काल (ता. 5) कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला खासदार प्रा. मंडलिक यांनी हजेरी लावली. त्या मेळाव्यात प्रा. मंडलिक यांनी दक्षिणमध्ये भाजपाचे उमेदवार आमदार अमल महाडिक यांच्याविरोधात श्री. पाटील यांचे पुतणे ऋतुराज यांना पाठिंबा जाहीर केल्याचे पडसाद या मेळाव्यात उमटले. पालकमंत्री पाटील यांनीच या विषयाला तोंड फोडताना या मतदार संघात भाजापाची अडीच लाख मते आहेत, आम्ही युती धर्म पाळला पण हीच मते प्रा. मंडलिक यांच्या विरोधात वळवली असती तर श्री. महाडिक हेच खासदार झाले असते, त्यामुळे "आमचं ठरलंय' म्हणणारेही पळून गेले असते, असाही टोला श्री. पाटील यांनी लगावला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com