Chandrakant Patil Comments on Laxman Jagtap's Weight | Sarkarnama

भाऊंचे राजकीय वजन वाढले,पण शारीरिक घटले; दादांनी,मात्र वजन कमी करावे : चंद्रकांत पाटील

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 जून 2019

पिंपरी-चिंचवडचे कारभारी आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप व उपकारभारी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना मंत्रिपदाची संधी आहे.पण त्यांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी,असा वडीलकीचा सल्ला राज्याचे महसूलमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पिंपरी-चिंचवडमध्ये दिला. त्यामुळे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्याने नाराज झालेल्या भाऊ व दादांच्या समर्थकांचा उत्साह आता ऑक्‍टोबरमध्ये शहराला मंत्रिपद पुन्हा मिळेल, या शक्‍यतेने पुन्हा वाढला आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे कारभारी आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप व उपकारभारी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना मंत्रिपदाची संधी आहे.पण त्यांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी,असा वडीलकीचा सल्ला राज्याचे महसूलमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पिंपरी-चिंचवडमध्ये दिला. त्यामुळे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्याने नाराज झालेल्या भाऊ व दादांच्या समर्थकांचा उत्साह आता ऑक्‍टोबरमध्ये शहराला मंत्रिपद पुन्हा मिळेल, या शक्‍यतेने पुन्हा वाढला आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच भाजपची सत्ता आणून नुकत्याच झालेल्या लोकसभेला मावळात युतीचा उमेदवार विजयी केल्याने भाऊंचे (जगताप) राजकीय वजन वाढल्याचे प्रशंसोद्‌गार चंद्रकांत पाटील यांनी काढले. त्याचवेळी घटलेल्या त्यांच्या शारीरिक वजनाविषयी त्यांनी चिंताही व्यक्त केली. त्यामुळे ते वाढविण्यास मी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितले आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हणताच एकच हशा पिकला. पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश बापट यांनीही आपल्या खुसखुशीत शैलीत जगताव यांच्या डाएट प्लानवर याच महिन्याच्या 11 तारखेला पिंपरी-चिंचवडमध्येच भाष्य केले होते.""डायट करा,पण एवढेही करू नका. जरा, महेशदादांच्या शेजारी बसा'',असे ते त्यावेळी म्हणाले होते. त्यावर मोठा हास्यस्फोट झाला होता. तसा तो आजही चंद्रकांत पाटील जगताप यांच्या डायटवर बोलताच पुन्हा झाला. मात्र,त्याचवेळी शेजारी बसलेल्या महेश लांडगे यांनी वजन कमी करावे,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पिंपरी पालिकेत सत्ता आणूनही भाऊ व दादांना मंत्रिपदासाठी डावलली गेल्याची सल पक्षाचे पिंपरी-चिंचवड कार्यालय पाहण्यास आलेल्या चंद्रकांतदादांसमोर बोलून दाखविताच त्यांनी सबुरीचा सल्ला दिला. पुणे जिल्ह्यालाही मंत्रिमंडळात स्थान नव्हते. ते बाळा भेगडेंना संधी देऊन भरून काढले. जिल्ह्यातील मंत्री झाला. आता पिंपरी-चिंचवडचाही होईल. दादा व भाऊंना योग्यवेळी योग्य काम देऊ. त्यांनी काम करीत राहावे. त्याची निश्‍चित दखल घेतली जाईल. त्याचवेळी त्यांनी श्रद्धा व सबुरीही ठेवावी, असा कानमंत्र चंद्रकांतदादांनी भाऊ व महेशदादांना दिला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख