एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही  : चंद्रकांत पाटील  - Chandrakant Patil assures Maratha students | Politics Marathi News - Sarkarnama

एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही  : चंद्रकांत पाटील 

सरकारनामा
बुधवार, 15 मे 2019

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेले; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे प्रवेश रद्द झालेले विद्यार्थी, पालक व मराठा समाजातील नेत्यांशी पाटील यांनी बुधवारी चर्चा केली.

मुंबई : मराठा समाजातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत आहोत. या मुद्द्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, या विषयावर मार्ग काढण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे परवानगी मागितली आहे. लवकरच त्यावर तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री व मराठा आरक्षण अंमलबजावणी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेले; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे प्रवेश रद्द झालेले विद्यार्थी, पालक व मराठा समाजातील नेत्यांशी पाटील यांनी बुधवारी चर्चा केली. त्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशासंबंधी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवेश रद्द झालेल्या मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे.

वैद्यकीय पदव्युत्तरच्या जागा वाढवून मिळण्याबाबतही केंद्र सरकारकडे पत्र पाठवण्यात आले आहे. निवडणूक आयोगाची परवानगी आल्यानंतर राज्य सरकार तातडीने कार्यवाही करणार असून त्यासंबंधीच्या कायदेशीर बाबींची प्रक्रिया सुरू केली आहे. एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी अस्वस्थ होऊ नये, असे आवाहन पाटील यांनी केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख