चंद्रकांतदादांनी वैभव नायकवडींना  कार्यक्रमातच केले 'भाजपवासी'  

राज्यातील पुरोगामी चळवळीचे दिवंगत अग्रणी नेते क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांचे चिरंजीव आणि हुतात्मा उद्योगसमुहाचे नेते वैभव नायकवडी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील. आत्ता ते भाजपमध्येच आहेत, असा गौप्यस्फोट महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खुद्द वाळव्यात केला.
चंद्रकांतदादांनी वैभव नायकवडींना  कार्यक्रमातच केले 'भाजपवासी'  

सांगली : राज्यातील पुरोगामी चळवळीचे दिवंगत अग्रणी नेते क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांचे चिरंजीव आणि हुतात्मा उद्योगसमुहाचे नेते वैभव नायकवडी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील. आत्ता ते भाजपमध्येच आहेत, असा गौप्यस्फोट महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खुद्द वाळव्यात केला. मंत्री पाटील यांच्या या वक्तव्यावर नायकवडी यांनी सभास्थळी कोणतेच भाष्य केले नाही. चंद्रकांतदादांचे हे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधातील भाजपच्या मोर्चेबांधणीचे ठोस पाऊल मानले जात आहे.

वाळव्यातील विविध विकासकामांच्या उद्‌घाटनप्रसंगी स्वाभीमानी शेतकरी संघटनेपासून सवता सुभा मांडत भाजपवासी झालेल्या राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी "वैभव नायकवडी यांनी आता बांधावर थांबू नये, शेतात यावं आणि पेरणीला सुरुवात करावी. पीक निश्‍चित येईल,'' असे आवाहन केले. त्यांचा हा धाग पकडत चंद्रकांतदादा म्हणाले,"वैभवकाका बांधावर नाहीत तर शेतात आहेत. माझ्या खुर्चीला त्यांची खुर्ची आहे. आणि माझा भगवा रंग इतका गडद आहे की तो शेजारी बसणाऱ्याला लागतोच आणि एकदा लागल्यावर जात नाही. वैभवकाका आता भाजपमध्ये आहेत. त्यांचा पक्षप्रवेश आम्ही लवकरच घेणार आहोत. एका निमित्ताच्या शोधात आम्ही आहोत. निमित्त सापडताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि पन्नास हजारांच्या साक्षीने वैभवकाकांचा भाजपप्रवेश होईल.'' 


या समारंभात बोलताना वैभव नायकवडी यांनी विद्यमान राज्य सरकारची मुक्तकंठाने प्रशंसा केली. दादांच्या कामाच्या झपाट्याचेही त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले,"चंद्रकांतदादा रात्रंदिवस जनतेसाठी झटत आहेत. खऱ्या अर्थाने त्यांनी रस्ते, सहकार व शेतीसाठी त्यांनी योगदान दिले. भाजप सरकारने साखरेची पायाभूत किंमत 2900 रुपये प्रतिक्विंटल ठरवली ती आता 3100 रुपये करावी. हुतात्मा साखर कारखान्याच्या निर्मितीसाठी मोठा संघर्ष करावा लागला. मात्र कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प चंद्रकांतदादांनी क्षणार्धात मंजूर केला. भाजप सरकारने साखरेला निर्यात अनुदान दिले. चंद्रकांतदादांचे तर आम्हाला मोठे सहकार्य आहे.''

जयंत पाटील यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढवलेल्या नायकवडी यांनी भाजपशी प्रसंग परत्वे जवळीक केली आहे. जयंत पाटील विरोधकांच्या आघाडीत ते आहेत. मात्र त्याचवेळी त्यांनी जयंतरावांशी थेट विरोधाची भूमिका मात्र विधानसभेनंतर टाळली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर गेल्या चार वर्षांत नायकवडी यांची भाजपशी जवळीक चर्चेचा विषय ठरली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा उद्योग समूहाला भेट दिली आहे. नागनाथअण्णांच्या स्मारकाला राज्य शासनाने निधीही तातडीने दिला आहे. चंद्रकांतदादा आणि वैभव नायकवडी यांचे घरोब्याचे संबंध प्रस्थापित झाले आहेत. 

तथापि नायकवडी यांची राजकीय पार्श्‍वभूमी पाहता त्यांचा भाजप प्रवेश स्थानिक राजकीय संदर्भ बदलणारा ठरू शकतो. मंत्री पाटील यांच्या या वक्तव्याने वैभव नायकवडींचा भाजप प्रवेश निश्‍चित्त मानला जातो आहे. मात्र नायकवडी यांनी आज दुसऱ्या दिवशी अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. 


मंजुरीचे पत्र व्हॉटस्‌ऍपवरून

हुतात्मा कारखान्याच्या मद्यार्क तसेच वीज प्रकल्पासाठी राज्य शासनाने जलदगतीने मदत केली आहे. आता वीज प्रकल्पाच्या खरेदी कराराला तातडीने मंजुरी द्यावी अशी विनंती नायकवडी यांनी करताच चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पोचण्यापूर्वी आजच मंजुरीचे पत्र वैभवकाकांना 'व्हॉटस अॅप' करू असे सांगितले. त्यांनी कार्यक्रमस्थळावरूनच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना फोन केला आणि रात्रीच मंजूरी मिळेल अशी ग्वाही दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com