Chandrakant Patil , Amit Shah & biography | Sarkarnama

चंद्रकांतदादांकडून आएएस अधिकाऱ्यांना वाटप होतेय अमित शहा यांची जीवनगाथेचे !

संजय मिस्कीन 
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

एका कापडी पिशवीत व्यवस्थित पॅकिंग करून त्यावर स्वतःच्या मनोगताचे एक पत्र जोडून चंद्रकांत पाटील यांनी ते पुस्तक सर्व व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले आहे.

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचा जीवनपट उलघडणारी 'जीवनगाथा' राज्यातील वरिष्ठ सनदी व पोलिस अधिकारी यांना भेट म्हणून दिली जात असल्याने प्रशासनात याची जोरदार चर्चा रंगली आहे.

राज्यातील उच्चपदस्थ अधिकार पदावर असलेल्या आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये सध्या हा विषय चर्चेत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवन पटाचे दर्शन घडवणारे 'अमित शहा अँड द मार्च ऑफ बीजेपी' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. अमित शहा यांचे निकटवर्तीय व राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे पुस्तक राज्यातील सनदी अधिकाऱ्यांना पोहचवण्याची जबाबदारी घेतली आहे.

 अमित शहा यांच्या राजकीय प्रवासातील चढ-उतार आणि त्यांच्या कर्तृत्वाने देशाच्या राजकारणावर उमटवलेले ठसे याचा आलेख या इंग्रजी भाषेतील पुस्तकात मांडण्यात आला आहे.

एका कापडी पिशवीत व्यवस्थित पॅकिंग करून त्यावर स्वतःच्या मनोगताचे एक पत्र जोडून चंद्रकांत पाटील यांनी ते पुस्तक सर्व व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले आहे.

या देशाच्या विकासाच्या जडण-घडणीत अमित शहा यांच्या नियोजन कौशल्याची सविस्तर मांडणी या पुस्तकात केल्याचे चंद्रकांत पाटील यानी पत्रात नमूद केले आहे. अमित शहा यांनीच भारतीय जनता पक्षाला जगाच्या पातळीवरील एक मोठा पक्ष म्हणून उदयास आणले. अशी भावना चंद्रकांत पाटील यांनी या पत्रात व्यक्‍त केली आहे.

अमित शहा यांच्या कामाची पद्धत आणि निर्णय घेण्याची क्षमता याचे कौतुक करताना, भारतीय जनता पक्षाला मोठा करण्यात अमित शहा यांचा सिंहाचा वाटा आहे असे पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे. सर्व अधिकाऱ्यांनी वाचावे असे हे पुस्तक असल्याचे पाटील आपल्या पत्रात म्हणतात.

देशपातळीवर पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, डॉक्‍टर श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांच्यापासून ते सरदार वल्लभाई पटेल यांच्यापर्यंत अनेक मोठ्या व्यक्तींवर आत्मचरित्र आणि त्यांचा जीवनपट मांडणारी पुस्तके प्रकाशित झाली.

मात्र कोणत्याही मोठ्या राजकीय नेत्याचे पुस्तक राज्यातील कोणत्याही मंत्र्याने आजवर स्वतःहून आयएएस आणि आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांना वितरित केल्याची घटना यापूर्वी कधीही घडली नव्हती.

पहिल्यांदाच चंद्रकांत दादा पाटील यांनी हे पुस्तक स्वतः पुढाकार घेऊन सर्व विभागांच्या प्रधान सचिव मंडळींपासून आयुक्तापर्यंत वितरित केल्याची चर्चा मंत्रालयात रंगली आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख