Chandrakant Patil accepts that he had tried to get Shivsena Ticket for Mahadik | Sarkarnama

चंद्रकांत पाटलांचा कबुलीजवाब :  धनंजय महाडिकांना शिवसेनेची  उमेदवारी मिळावी म्हणून  प्रयत्न केले 

निवास चौगले 
शुक्रवार, 15 मार्च 2019

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील दररोज एक मोठे घराणे भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल होणार आहे. - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर:  "धनंजय महाडीकच शिवसेनेचे उमेदवार असावेत,यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही ", अशी कबुली  शिवसेना - भाजप  युतीचे समन्वयक पालकमंत्री  चंद्रकांत पाटील यांनी  पत्रकारांशी बोलताना दिली . 

" धनंजय महाडीक यांनी मी राष्ट्रवादी पक्षाचा पाच वर्षे खासदार होतो, असे सांगीतले. त्यामुळे हा विषय थांबला .  खरे तर असे मान्य करणारी खूप कमी माणसं असतात, त्यात धनंजय महाडीक हे आहेत,"  अशी स्तुतीसुमनेही श्री.पाटील यांनी उधळली. 

श्री. पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर लोकसभा मतदार संघातयेणाऱ्या  सहा विधानसभा मतदार संघातील भाजपा पदाधिकार्यांची बैठक झाली. बैठकीला राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडीक यांचे बंधू व भाजापाचे आमदार अमल महाडीक, भावजय जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडीक आदि उपस्थित होते. त्यानंतर श्री. पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते पुढे म्हणाले, "शेवटी युध्द क्‍लिअर झाले आहे. समोर पार्ट्या ठरल्या. अतिशय ताकदीने लढण्यासाठी आम्ही सहा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना इथं बोलविले आहे. दिशा स्पष्ट असली तरी धुसर होती.आजच्या बैठकीनंतर सगळे कामाला लागतील. शेवटी युती महत्वाची आहे.मोदीच पंतप्रधान व्हावेत,हे महत्वाचे आहे.' 

" लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील दररोज एक मोठे घराणे भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल होणार आहे. पक्षाची ताकद वाढणार आहे.आज उत्तर महाराष्ट्रातील एक घराणे पक्षात आलेलं तुम्हाला लवकरच पहायला मिळेल. तर सोलापूरातील एक घराणेही दाखल होईल", असे वक्तव्य करत पालकमंत्री पाटील यांनी महाराष्ट्रातील बदलते राजकारण स्पष्ट केले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख