chandrakant patil about power | Sarkarnama

सत्ता असू दे अथवा नसू दे आम्हाला काही फरक पडत नाही!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

आमच्याकडे बोट दाखविणाऱ्यांनी त्यांच्या आघाडीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव गायब कसे झाले? याचे स्पष्टीकरण द्यावे. महाशिवआघाडी म्हणता म्हणता त्यांची महाविकास आघाडी असे नामकरण कसे झाले? याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवे.

कोल्हापूर : 'गोकुळ'च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची सर्व ताकद महादेवराव महाडिक यांच्या पाठीशीच असेल, असे वक्तव्य करत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली. एकेकाळी शेतकरी कामगार पक्ष, कॉग्रेस, राष्ट्रवादीचा असणारा हा जिल्हा आता भाजपाचा जिल्हा म्हणूनच पुढे येईल, असे मतही पाटील यांनी व्यक्त केले. 

भाजपा कार्यकर्त्यांचा मेळाव्यात बोलताना पाटील म्हणाले, विरोधकांनी मेळाव्याला झालेली ही गर्दी पहावी, म्हणजे त्यांना समजेल की , भाजपाकडे सत्ता असू दे अथवा नसू दे आम्हाला कांही फरक पडत नाही. भारतीय जनता पार्टीवर लोकांचे प्रेमच आहे. आमच्यावर खालच्या पातळीवर जाउन टीका करणाऱ्यांना मी चोख उत्तर दिले आहे. त्याची पुनरावृत्ती नको,पण यापुढे त्यांनी त्याची काळजी घ्यावी. हम किसोको टोकेंगे नही,हमको टोकेंगे तो छोडेंगे भी नही. राज्यात हे तिन पक्षाचे सरकार आले आहे. ही अनैतिक अशी युती आहे. आमच्या घरातून शिवसेनेच्या आमच्या भावाला चोरुन ही सत्ता घेतली आहे. मलईची सगळी मंत्रीपदे राष्ट्रवादीकडे आहेत. छत्रपती शिवरायांचा सन्मान करण्याचे काम नेहमीच भारतीय जनता पार्टीने केले आहे. पण आमच्याकडे बोट दाखविणाऱ्यांनी त्यांच्या आघाडीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव गायब कसे झाले? याचे स्पष्टीकरण द्यावे. महाशिवआघाडी म्हणता म्हणता त्यांची महाविकास आघाडी असे नामकरण कसे झाले? याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवे. भाजप विरोधात सगळे एकत्र आहेत. त्यामुळे संघटीतपणे आपण त्यांच्याशी संघर्ष केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख