chandrakant patil about mund, bhujbal and dange role | Sarkarnama

गोपीनाथ मुंडे, भुजबळ, अण्णा डांगेंनी आरक्षणात घोटाळा केला : चंद्रकांत पाटील 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मराठा समाजाला मागासलेपण सिद्ध करण्यास सांगितले जाते, तसेच इतर जातींनीही केले पाहिजे. आरक्षणाचा दर 10 वर्षांनी आढावा घेतला पाहिजे आणि प्रगत जातींना आरक्षणातून वगळले पाहिजे, असा कायदा आहे.

-चंद्रकांत पाटील 

पुणे: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ओबीसी नेते छगन भुजबळ हे इतरांना धक्‍का न लावता मराठा आरक्षण देण्याची भूमिका मांडत आहेत, मात्र काल कोल्हापुरात झालेल्या बैठकीत मराठ्यांचा समावेश थेट ओबीसीत करण्याची मागणी करण्यात आली. मराठ्यांना आरक्षण मिळायचे असेल तर इतरांना धक्‍का द्यावा लागेल, अशी रोखठोक भूमिका मराठा आरक्षणाचे अभ्यासक चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मांडली. 

मराठा आरक्षणाबाबत सुरवातीपासून संभ्रम आहे. ते न्यायालयात टिकणार कां, हाच कळीचा मुद्दा आहे. गेला महिना तर राज्यात आरक्षणावरुन आगडोंब उसळला होता. मागासवर्ग आयोगाचा अहवाल अपेक्षित धरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्‍वासन दिले आहे. मात्र अनेकांचा या आश्‍वासनांवर विश्‍वास नाही. कोल्हापुरकरांनी आपले आंदोलन थांबवलेले नाही. त्यांनी काल बैठक घेवून पुढील भूमिका जाहीर केली. ते मुंबईला मोर्चा घेवून जाणार आहेत. 

या बैठकीत अभ्यासक चंद्रकांत पाटील म्हणाले की, इतरांच्या आरक्षणाला धक्‍का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या असे म्हणणारे राज्यकर्ते दिशाभूल करत आहेत. संविधानानुसार 50 टक्‍क्‍यांहून अधिक आरक्षण देता येत नाही. त्यामुळे अनुसूचित जाती, जमातींचे आरक्षण वगळता इतरांना धक्‍का दिला तरच आरक्षण मिळणार आहे. 1994 ला गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, आण्णा डांगे यांनी आपापल्या समाजासाठी आरक्षणात घोटाळा केला. वंजारी समाजाची लोकसंख्या 0.25 टक्‍के असताना त्यांचा एन टी (ड) मध्ये समावेश करुन 2 टक्‍के आरक्षण देण्यात आले. हा समाज भटकंती करतो कां? आता मूळ दुखण्यावर बोट ठेवले पाहिजे. या नेत्यांची मखलाशी आपल्या आमदारांना दाखवा आणि त्यांना सभागृहात उघडे पाडण्यास सांगा, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख