स्वबळाच्या लढाईत थेट जनसंपर्काच्या बळावर खैरे औरंगाबादचा गड राखतील ?

स्वबळाच्या लढाईत थेट जनसंपर्काच्या बळावर खैरे औरंगाबादचा गड राखतील ?

औरंगाबाद : आतापर्यंत झालेल्या 16 लोकसभा निवडणुकांपैकी औरंगाबादमध्ये सलग चार निवडणुका शिवसेनेने जिंकल्या आहेत. खासदार चंद्रकांत खैरे हे औरंगाबाद लोकसभेचे वीस वर्षापासून प्रतिनिधित्व करणारे एकमेव खासदार ठरले आहेत. अर्थात या सगळ्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होती. आगामी लोकसभा निवडणुका हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. 

हिंदु मतांचे ध्रुवीकरण या निकषावर शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळणार असे तर्क लढवले जात असले तरी तीन लाखांवर मतदारांशी थेट संपर्क या जोरावर स्वबळाच्या लढाईतही शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे पाचव्यांदा आपला गड राखण्यात यशस्वी ठरण्याची शक्‍यता आहे. 89 ते 2014 अशा आठ निवडणुकीपैकी 98 चा अपवाद वगळता शिवसेनेने या मतदारसंघात विजय मिळवलेला आहे. 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत वेरूळच्या शांतिगीरी महाराजांना विरोधकांनी रसद पुरवून आणि त्यांनी दीड लाख मते मिळवल्यानंतरही शिवसेनेने 33 हजार मतांची आघाडी घेत आपला गड राखला होता. 2014 मध्ये शिवसेनेचे मताधिक्‍य 1 लाख 62 हजारांवर गेले होते. पण मोदी लाटेमुळे हे घडल्याचा दावा भाजपकडून केला गेला. 

विधानसभेतील विजयाने भाजपला बळ 
2014 च्या विधानसभेसाठी युती तुटल्यानंतर मोदी लाटेने भाजपला मोठ्या भावाच्या भूमिकेत नेऊन बसवले तर आमदारांची संख्या 63 वर जाऊनही शिवसेना बॅकफुटवर आली. औरंगाबाद लोकसभेच्या अंतर्गत येणाऱ्या शहरातील तीन आणि वैजापूर, गंगापूर-खुल्ताबाद, कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला याचा चांगलाच फटका बसला. 

भाजपने शहरातील पूर्व आणि ग्रामीण भागातील गंगापूर-खुल्ताबाद मतदारसंघात विजय मिळवला. याशिवाय 2015 मध्ये झालेल्या महापालिका आणि त्यानंतरच्या जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत देखील भाजपने घवघवीत यश मिळवले. या जोरावरच आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची भाषा आणि तयारी भाजपने वर्षभरापासून सुरू केली होती. 

खैरे-बागडे लढत रंगणार 
आता घोडा मैदान समोर असतांना भाजपकडून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. बागडे लोकसभा लढवण्यास इच्छूक नाहीत तर जयसिंगराव गायकवाड गेल्या कित्येक वर्षापासून राजकारणात सक्रीय नाहीत. अशावेळी भाजप बागडे यांनाच उमेदवारीसाठी गळ घालण्याची शक्‍यता आहे. एकमेकांवरील आरोप आणि प्रत्यारोपामुंळे सध्या जिल्ह्याच्या राजकारणात खैरे-बागडे चांगलेच चर्चेत आहेत. 

शिवसेना चंद्रकांत खैरे यांच्याशिवाय दुसऱ्या नावाचा विचार करण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे खैरे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. पक्षांतर्गत विरोधकांनी खैरे यांच्या विरोधात मतदारसंघात कसा असंतोष आहे याचे वर्णन पक्षप्रमुखांकडे केले असले तरी स्वबळाच्या लढाईत उध्दव ठाकरे पुन्हा खैरेंवरच विश्‍वास टाकणार हे स्पष्ट आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची लोकसभेसाठी आघाडी निश्‍चित झाली असली तरी औरंगाबादच्या जागेवरून घोडे अडले आहे. कॉंग्रेस सातत्याने पराभूत होत असल्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीला द्या अशी मागणी आणि जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादीच्या वाट्याला ही जागा आली तर मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण हे आपले नशीब आजमावणार आहेत. 

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आणि त्या अंतर्गत येणारे शैक्षणिक संस्थांचे जाळे, दोनवेळा पदवीधर निवडणुकीच्या माध्यमातून थेट मतदारांपर्यत पोचण्याचे कौशल्य आणि मराठा उमेदवार या जोरावर सतीश चव्हाण दिल्लीकडे कूच करण्याच्या प्रयत्नात आहेत. पण त्यांच्या या प्रयत्नात भाजपच्या हरिभाऊ बागडे, व नुकताच स्वतंत्र पक्ष स्थापन करून लोकसभेच्या आखाड्यात उतरलेले आमदार हर्षवर्धन जाधव यांचा अडथळा असेल. कॉंग्रेसने आपला दावा कायम ठेवला तर माजी आमदार डॉ. कल्याण काळे, विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड उमेदवार असू शकतील. 

दलित, मुस्लिमांसह वंचित बहुजनांची मोट बांधत राज्यात आगळे-वेगळे राजकीय समीकरण रूढ करणारे प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीने आपले पत्ते अजून उघडलेले नाहीत. शहरातील मुस्लिम मतदारांची संख्या लक्षात घेता वंचित आघाडी ही जागा एमआयएमला देण्याची शक्‍यता आहे. मध्यचे आमदार इम्तियाज जलील यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून बघितले जाते. 

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सुरूवात औरंगाबादेतून झाल्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वप्रथम विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देखील याच जिल्ह्यातील आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, कॉंग्रेसचे अब्दुल सत्तार यांनी राजीनामे दिले होते. याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न म्हणूनच हर्षवर्धन जाधव यांच्या लोकसभा लढवण्याच्या निर्णयाकडे पाहिले जाते. 

अठरा लाख मतदार संख्या असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवस्वराज्य बहुजन पक्ष, वंचित बहूजन आघाडी, समाजवादी, बसपा अशा राजकीय पक्षांच्या भाऊगर्दीत खरी लढत प्रमुख तीन पक्षांमध्येच होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मतांचे ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होणार आहे. सगळेच पक्ष मराठा उमेदवार देणार असल्यामुळे ही मत देखील विभागली जातील. युती तुटल्याचा फटका जसा शिवसेनेला बसेल तसा तो भाजपलाही बसणार आहे. अशावेळी आक्रमक हिंदुत्व, थेट संपर्क आणि मतदारसंघात सर्वाधिक उपलब्ध असणारे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पुन्हा बाजी मारण्याची शक्‍यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com