Chandrakant dada Patil taunts Ajit dada! | Sarkarnama

पुणे जिल्ह्यातील नेत्यांची 'दादा'गिरी  खपवून घेणार नाही  : चंद्रकांतदादांचा नेम अजितदादांवर !

रमेश ससार 
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

चांगले दर्जेदार रस्ते करण्यासाठी यापुढे कुणाचीच दादागिरी खपवून घेतली जाणार नाही.  

- चंद्रकांत दादा

हिंजवडीः " पुणे जिल्ह्यातील नेत्यांची दादागिरी आता खपवून घेणार नाही", असा इशारा राज्याचे महसूलमंत्री कोल्हापूरचे चंद्रकांतदादा पाटील यांनी  येथे दिला. त्यांचा रोख हा राष्ट्रवादीचे अजितदादा पवार व भोरचे आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या दिशेने होता.

 पुण्यातील या दोन दादांच्या होमपीचवर येऊन हा इशारा देण्यात आला, हे विशेष. नेमस्त स्वभावाच्या चंद्रकांतदादांनी आक्रमक अजितदादांना हूल दिल्याने ती चर्चेचा विषय झाली. पवार यांच्या बारामती लोकसभा, तर थोपटे यांच्या भोर विधानसभा मतदारसंघात हिंजवडी औद्योगिक परिसरातील रस्ते भूमीपूजन रविवारी संध्याकाळी झाले . तेंव्हा चंद्रकांतदादा बोलत होते.

 या शासकीय कार्यक्रमाला स्थानिक खासदार (सुप्रिया सुळे) आणि आमदार (संग्रामदादा थोपटे)असे दोघेही पत्रिकेत नाव टाकूनही उपस्थित नव्हते. कार्यक्रमाला गर्दी न जमण्य़ाचे खापर खापर भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक साठे यांनी दोन्ही कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षांवर फोडले. हा सोहळा फेल करण्यासाठी उपस्थित राहू नका, अशी फोनाफोनी झाल्याचा आरोप त्यांनी केला.

 हे ऐकून चंद्रकांतदादा व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट पाटील यांनी दोन्ही काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. चंद्रकांत दादांनी अजित पवारांचे नाव न घेता इशारा दिला . ते म्हणाले ,"या रस्त्यांवरून सर्वपक्षीय कार्य़कर्ते जाणार आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील नेत्यांनी विकासात राजकारण करू नये. आम्हाला पण राजकारण करता येते. परंतु आम्ही ते विकासात आड आणत ऩाही. "

"विकास होत असताना रस्त्याच्या ठेकेदाराकडून कुणी टक्केवारी मागितली.कुणी दादागिरी करयला लागले तर थेट मला फोन करा. चोविस तास माझा फोन उपलब्ध आहे. मात्र चांगले दर्जेदार रस्ते करण्यासाठी यापुढे कुणाचीच दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. "

युती होईल की नाही,याविषयी शंका असताना दुसरीकडे दोन्ही कॉंग्रेसची आघाडी ही जवळपास निश्चीत झाल्याने चंद्रकांतदादांनी दोन्ही दोन्ही कॉंग्रेसला लक्ष्य केले. त्यातही त्यांचा रोख कॉंग्रेसकडे अधिक होता. ते म्हणाले, "भाजप हा जातीयवादी पक्ष म्हणून काँग्रेसवाल्यांनी कायम आमचा अपप्रचार केला. कांग्रेसवाले हे भाजप भूत असल्याचे लोकांना दाखवत गेले. त्यांनी लोकांची कामे प्रलंबीत ठेवली. पानशेत प्रकल्पग्रस्तांना वर्षानुवर्षे घरे देखील मिळू दिली नाहीत. त्यांना झुलवत ठेवले."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख