चंद्रकांतदादा पाटलांच्या "एकला चलो' घोषणेने भाजप नगरसेवकांना बळ

चंद्रकांतदादा पाटलांच्या "एकला चलो' घोषणेने भाजप नगरसेवकांना बळ

औरंगाबाद : भाजपशी युती तोडून राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे सरकार स्थापन होऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले. याचे पडसाद आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उमटायला सुरूवात झाली आहे. भाजपच्या मराठवाडा विभागीय बैठकीला औरंगाबादेत आलेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सहा महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी "एकला चलोरे'ची घोषणा नुकतीच केली. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत त्याचे पडसाद उमटले. 

शिवसेनेने अभद्र युती करून मुख्यमंत्रीपद घेतले असा आरोप करत भाजपच्या नगरसेवकांनी उध्दव ठाकरे यांच्या अभिनंदन प्रस्तावास विरोध केला आणि आगामी काळातील वादाची ठिणगी पडली. महापालिकेच्या निवडणुका सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. गेली पंचवीस वर्ष महापालिकेवर शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. सुरूवातीपासून मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेली शिवसेना 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर बॅकसीटवर गेली. 

परिणामी शिवसेनेचे बोट धरून वाढलेल्या भाजपने गुरगुर करायला सुरूवात केली. कधीकाळी महापालिकेत एक आकडी नगरसेवक असलेली भाजप शिवसेनेच्या बरोबरीने आल्यामुळे सहाजिकच गेल्या पाच वर्षात या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नाही. विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी शिवसेनेशी असलेली युती तोडून भाजपने दगा दिल्याची भावना शिवसैनिकांमध्ये असल्यामुळे भलेही नंतर सत्तेसाठी दोन्ही पक्ष एकत्र आले, पण त्यांची मने मात्र जुळलेली नव्हती. 

औरंगाबाद, जालन्यातून महाआघाडीचा प्रयोग 
सर्वाधिक 122 आमदार निवडून आणल्यानंतर भाजपने गेली पाच वर्ष राज्याचा कारभार हाकतांना शिवसेनेला अक्षरशः आपल्या मागे फरफटत नेले. पण पर्याय नसल्याने शिवसेनेने भाजपची दादागिरी सहन केली. विधानसभेनंतर राज्यात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विशेषत मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालन्यात शिवसेनेने सर्वप्रथम महाआघाडीचा यशस्वी प्रयोग केला. 

या दोन्ही जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य असून देखील भाजपला विरोधात बसावे लागले. जालन्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेत तर औरंगाबादेत कॉंग्रेसच्या मदतीने जिल्हा परिषदेची सत्ता आपल्या हाती ठेवली, याचे शल्य देखील भाजपला बोचत आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रात शिवसेनेची गरज असल्यामुळे भाजपने हा अपमान पचवला. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनादेश मिळालेला असतांना शिवसेनेने राज्यात महाआघाडीचा प्रयोग केला. 

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह कॉंग्रेस नेतृत्वाकडूनही त्याला प्रतिसाद मिळाल्यामुळे पुन्हा एकदा भाजपला सर्वाधिक आमदार निवडून आलेले असतांना विरोधी बाकावर बसावे लागले. अजित पवारांना बंड करायला लावून काही तासांसाठी भाजपने महाआघाडीला धक्का देण्याचा प्रयत्न केला, पण तो डावही त्यांच्यावर उलटला. पाण्यावाचून तडफडणाऱ्या माशाची जशी स्थिती होते, तशीच काहीशी अवस्था सध्या भाजपची झाली आहे. राज्य पातळीवर ओबीसी नेत्यांनी पुकारलेले बंड थोपवण्यात भाजपला यश आले नसले तरी, शिवसेनेपुढे नमते घ्यायचे नाही असे धोरण दिल्लीतून ठरवण्यात आल्याची चर्चा आहे. 

शिवसेनेच्या मुळावर घाव 
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औंरगाबाद महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढेल असे जाहीर केले आहे. त्यानंतर आज भाजप नगरसेवकांनी सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. महाआघाडीला अभद्र युती म्हणून हिणवणाऱ्या भाजपला, तुम्हाला अजित पवारांचा पाठिंबा कसा चालतो ? म्हणत जशास तसे प्रत्युत्तर दिले. ही तर सुरुवात आहे, भविष्यात शिवसेना-भाजपमध्ये आणखी बरेच वाद होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. मुंबई-पुण्यानंतर मराठवाड्यातील ज्या औरंगाबाद शहरातून शिवसेनेला ताकद मिळाली त्या मुळावरच घाव घालण्याचा पहिला प्रयत्न भाजपकडून महापालिका निवडणूकीत केला जाणार याचा आज महापालिकेत घडलेला प्रकार म्हणजे ट्रेलर असल्याचे बोलले जाते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com