आता आव्हान करुन दाखवण्याचे!

जुन्या दगलबाज मित्राला धडा शिकवण्याच्या एकमेव कारणामुळे उद्धव मुख्यमंत्री झाले आहेत हे सर्वविदित. मात्र शिवसेनेचा मानसन्मान केवळ अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या शब्दापुरता मर्यादित नाही ,तर तो महाराष्ट्राच्या व्यापक हिताशी नाते सांगणारा आहे, याची ग्वाही त्यांना कृतीतून दयावी लागणार आहे.
Challenge Before Aditya And Uddhav Thackeray to Show Potential
Challenge Before Aditya And Uddhav Thackeray to Show Potential

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शांत संयत नेते म्हणून महाराष्ट्राला परिचित. रस्त्यावर राडे करण्याची सवय अंगी बाणलेल्या शिवसेनेला त्यांनी बोर्डरूमच्या वातावरणात नेले. काळानुरूप बदल घडवले. ठाकरेघराण्याच्या संस्कृतीत त्यांनी परिवर्तन आणले. सत्तेपासून दूर रहाण्याची परंपरा मोडली ती भाजपचे दिल्लीतले नवे नेते शब्द पाळण्यास तयार न झाल्याने. जुन्या दगलबाज मित्राला धडा शिकवण्याच्या एकमेव कारणामुळे उद्धव मुख्यमंत्री झाले आहेत हे सर्वविदित. मात्र शिवसेनेचा मानसन्मान केवळ अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या शब्दापुरता मर्यादित नाही ,तर तो महाराष्ट्राच्या व्यापक हिताशी नाते सांगणारा आहे, याची ग्वाही त्यांना कृतीतून दयावी लागणार आहे.

सत्ता केवळ भाजपची जिरवायला मिळवली नसून महाराष्ट्रात सक्षम विकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी हे दाखवणे ठाकरे यांच्यासमोरचे आव्हान आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या अवमाननाटयाचे लाभार्थी आहेत. कर्तीकरवती शिवसेना असल्याने त्यांनी उत्तम करून दाखवायचे आहे. स्वत: मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर घरच्याच युवा आदित्यला मंत्री करण्यामागचे कारण काय बरे असावे? आदित्य नव्या पिढीचे प्रतिनिधी आहेत,आधुनिक आहेत. त्यांचे वागणे विनयशील ,सौजन्यशील आहे. 2014 साली त्यांच्या हट्टामुळे युती झाली नाही या कथित प्रचारात त्यांना सत्तेची लालसा आहे, अशी संशयाला वाव देणारी भर मंत्रिमंडळ समावेशाने झाली आहे.

राजकारण्यांचे पती, पत्नी आणि अन्य नातलग त्या त्या नेत्याचे हात बळकट करण्याऐवजी त्याच्यासमोरचे आव्हानांचे लिप्ताळे ठरतात. रिमोट कंट्रोलने कळ दाबत सदासर्वकाळ सरकार इशाऱ्यावर नाचवण्याची भाषा न करता थेट निवडणूक मैदानात उतरलेले आदित्य एका अर्थाने वेगळे ठाकरे. त्यांचे आजोबा शिवसेनाप्रमुख या प्रादेशिक पक्षाचे निर्माते अन कर्तेधर्ते. नातवाला दसरा मेळाव्यात लॉंच करताना त्यांनी 'योग्य वाटेल तर याला स्वीकारा', असा विकल्प दिला. तरीही सैनिकांनीच नव्हे जनेतेनेही या वारसदाराला स्वीकारले ते त्याच्या सहजतेमुळे, उपलब्धतेमुळे. एकेकाळी भेट अप्राप्य असल्याची टीका उद्धव यांच्यावर झाली होती. मासा मेला म्हणून ते भेटायला तयार नाहीत अशी सेनेत परत आलेल्या अन आत्ताप्रमाणेच तेंव्हाही नाराज असलेल्या कोकणातल्या भास्कर जाधव यांचे वक्‍तव्या फार जुने नाही.

ते आक्षेप दूर झाले. आदित्य वरूण आणि तरूण चमूसमवेत सक्रीय झाले. 24 तास पक्षासाठी उपलब्ध राहिले. नव्या मनूचा हा शिपाई. तो थेट कॅबिनेट मंत्री झाला .का ते माहित नाही. तीन पक्षांमुळे सेनेच्या वाटयाला आलेली खाती कमी. सुभाष देसाई अनिल परब हे दोघे उद्धव यांचे विश्‍वासू. नियोजनात तल्लख, पक्षनिष्ठेत वादातीत. पण मुलाला अन परिषदेवर निवडून गेलेल्या या दोघांना स्थान दिल्याने सेनेच्या वाटयाला आलेल्या जागा तीनने कमी झाल्या. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या मदतीने सध्या सरकार स्थापून नंतर भाजपसमोर प्रखर ज्वलंत आणि लोकहितैषी प्रादेशिक पक्ष म्हणून पाच वर्षात उभे रहाणे हे उद्धव यांचे स्वप्न असावे. ते साधण्यासाठी प्रदेशवार प्रतिनिधित्व ,नव्याजुन्यांचा समन्वय आवश्‍यक. तसे कुठे दिसलेच नाही. 

शंकरराव गडाख ,यड्रावकर या बाहेरून आलेल्यांना मंत्रीपद दिले. तानाजी सावंतांसारखे महत्वाकांक्षी नेते विस्तारात दूर फेकले गेले तर शंभूराजे देसाईंसारख्या पश्‍चिम महाराष्ट्रातल्या ज्येष्ठाला केवळ राज्यमंत्रीपद मिळाले.नहे ही जावू देत. विस्ताराला पंधरा वीस दिवस हवेत अन खातेवाटपाला चार दिवस अपुरे, अशी या सरकारची स्थिती झाली आहे.

भाजपला रोखण्यासाठी तिघांनी हातमिळवणी केली. तेंव्हा मंत्रीप्रतिनिधित्वासंबंधी, खातेवाटपासंबंधी चर्चाही झाली नसेल ? तीन पक्ष एकत्र तर आले पण या तात्कालीकतेपलिकडे काय? कोणत्याही नव्या सरकारला सहा महिन्यांचा कालावधी दिला जावा मग टीका करावी. सर्वाधिक जागा जिंकूनही सत्ता गेल्याने भाजप ,देवेंद्र फडणवीस पहिल्या काही दिवसातच आग ओकू लागले. असा घायकुतेपणा अयोग्य. पण करून दाखवले म्हणणाऱ्यांचे काय ? कर्जमुक्‍ती मिळाली ती दोन लाखापर्यंतच्या मर्यादेत,10 रूपयात भोजन मिळणार ते मर्यादित संख्येतल्या भुकेलेल्यांना. एक रूपयात आरोग्य चाचणीच्या वचनाचे तर विस्मरण झाले, अशी शंका घेण्यास जागा. तीन पक्षांचे सरकार आकार घेण्यास वेळ लागणार हे मान्यच. पण किती?

देश आमच्या मर्जीने चालेल अशी मिजास बाळगणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी जे सरकार स्थापन झाले आहे त्याने काही थोर करून दाखवायला हवे. या निर्णयाचे भवितव्य सेनेच्या वाटचालीवर परिणाम करणारे आहे.

आदित्य ठाकरे वरुण ठाकरे शंभूराजे देसाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com