chakan maratha andolan chakka jam | Sarkarnama

चाकणमध्ये मराठा आंदोलन पेटलं, गाड्यांची जाळपोळ 

विलास काटे 
सोमवार, 30 जुलै 2018

चाकण (जि.पुणे) ः मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा आंदोलनाची धग चाकणच्या उद्योगनगरीला बसली आहे. पोलिसांच्या गाड्यांसह मालवाहू ट्रक,बस,एसटीसारख्या सुमारे शंभरहून अधिक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. 

चाकण (जि.पुणे) ः मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा आंदोलनाची धग चाकणच्या उद्योगनगरीला बसली आहे. पोलिसांच्या गाड्यांसह मालवाहू ट्रक,बस,एसटीसारख्या सुमारे शंभरहून अधिक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. 

दुपारनंतर लागलेल्या मोठ्या हिंसक वळणामुळे चाकणमधे सायंकाळपर्यंत तणावाचे वातावरण होते.कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे,पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दुपारी साडेतिनच्या दरम्यान चाकणला भेट देवून शांततेचे आवाहन केले. मात्र तरीही आंदोलक झुंडशाहीने महामार्गासह गल्लोगल्ली फिरत असल्याने सर्वसामान्य नागरिक,कामगार यांच्यात भितीदायक वातावरण होते. 

सकाळी मोर्चाला सुरूवात झाली. हजारोंच्या संख्येने मोर्चात आंदोलक होते. सुरूवातीला घोषणाबाजी सुरू होती. मात्र अचानक हिंसेने वळण घेतले आणि चाकण शिक्रापूर, तळेगावला जोडणाऱ्या नाशिक महामार्गावर बसेस, ट्रक आणि पोलिसांच्याच गाड्या जाळण्यात आल्या. दुपारी चारच्या सुमारास चाकणच्या उड्डाणपूलावर तीन प्रवाशी वाहतूक करणाऱ्या गाड्या जाळण्यात आल्या. त्या गाड्या जळून खाक होण्या आधिच जमावाने आणखी चार ट्रक महामार्गावर जाळले. 

याशिवाय एसटी स्थानकातील एसटी आणि इतर गाड्यांची जाळपोळ केली. नाशिक महामार्गावर चारचाकीबरोबरच दुचाकी गाड्या जळालेल्या अवस्थेत होत्या. माल वाहतूक आणि प्रवाशी वाहतूक करणा-या गाड्या रस्त्यावर बंद ठेवण्यात आल्या. तरीही ज्या रस्त्यावर धावत होत्या त्या शंभरहून अधिक गाड्यांच्या काचा फोडून चालकाना मारहाण करण्यात येत होती. पोलिसांचा बंदोबस्त आल्यावर जमाव पांगत होता. पोलिसांची पाठ फिरताच जमावाने हिंसक कृत्य करण्यास सुरूवात केली. यात दोन पोलिसांना मारहाण करून जमावाने जखमी केले.त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख