नाशिक लोकसभा मतदारसंघ : भुजबळांच्या उमेदवारीच्या चर्चेने शिवसेनेपुढे आव्हान

युतीच्या जागा वाटपात खासदार गोडसे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्याची दाट शक्‍यता आहे. अशातच, राष्ट्रवादीचे 'आर्मस्ट्रॉंग' नेते छगन भुजबळ यांचेही नाव चर्चेत आल्याने शिवसेनेपुढे आव्हान उभे ठाकले. बहुजन वंचित आघाडीतर्फे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळांसाठी उमेदवार न देण्याचे ठरवले. अशातच, अमितच्या विवाहाचे निमित्त साधत भुजबळ पिता-पुत्र-पुतणे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने शिवसेनेच्या विरोधातील मोट पक्की बांधली गेली.
 नाशिक लोकसभा मतदारसंघ : भुजबळांच्या उमेदवारीच्या चर्चेने शिवसेनेपुढे आव्हान

नाशिक : कधी लाट तर कधी जातीच्या समीकरण निवडणुकीचा रोख ठरवणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघात यावेळी विकास हा मुद्दा केंद्रस्थानी राहणार. गेल्या साडेचार वर्षात नाशिककरांमध्ये अन्याय झाल्याची भावना तयार झाली. मागील निवडणूक जात 'फॅक्‍टर'वर गेल्याने छगन भुजबळांचा श्री. गोडसे यांनी पराभव केला. त्यानंतर केंद्र अन्‌ राज्य सरकारकडून प्रश्‍न सुटण्याऐवजी जटील बनलेत. परिणामी, आगामी निवडणुकीत नाशिककरांकडून हक्काच्या माणसाचा शोध घेतला जाणार हे नक्की.

लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेला नाशिककरांनी साथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा केली. कालांतराने आश्‍वासनांचा फुगा फुटल्याने नैराश्‍य आले. दिल्ली अन्‌ मुंबईत नाशिकचे नेतृत्व खमके असावे या भावनाने मूळ धरलयं.

समृध्दी महामार्गाचे भूसंपादन, नाशिकचे हक्काचे पाणी मराठवाड्याकडे वळवणे, एकलहरा औष्णिक विद्युत केंद्र बंद पाडण्याचे प्रयत्न, उद्योगांसाठीचे भूसंपादन, उद्योगांचे स्थलांतर, विकास नियंत्रण नियमावलीतून बांधकाम व्यवसायाची झालेली कोंडी, नाशिक-पुणे महामार्ग चौपदरीकरणाचे रखडलेले काम, नाशिक-पुणे व नाशिक-सूरत रेल्वे मार्गाचे कागदावर राहिलेले आश्‍वासन असे विविध प्रश्‍न नाशिककर खुलेआम उपस्थित करु लागलेत.

सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत धुसफुसीचा "बिन-पैशाचा' तमाशा नाशिककरांना पाहायला मिळतोय. महापालिकेने लादलेल्या करवाढीने नैराश्‍याचा कडेलोट केला. नाशिकचे प्रश्‍न मांडायचे तरी कोणाकडे? पालकमंत्री गिरीष महाजन हे राजकारणात मग्न, तर आमदारांना मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलाच तर मिळाले फक्त आश्‍वासन. खासदार गोडसे यांनी त्यांच्या परीने विकास कामांचा आलेख हलता ठेवला.

नाशिकहून उडान योजनेतंर्गत दिल्ली, हैद्राबाद, अहमदाबाद विमानसेवा सुरु करण्यात त्यांचा वाटा आहे. मात्र एवढ्यावर नाशिककर समाधान नाहीत. पायाभूत सुविधांनी परिपूर्ण, मुबलक पाणी, रस्त्यांचे जाळे, मुंबई, पुणे, सूरत, औरंगाबाद या औद्योगिक शहरांपासून अगदी जवळचे अंतर असताना विकासाच्या तुलनेत मागे राहिल्याची सल आहे.

मतदारसंघातील महत्वाचे प्रश्‍न
- निरंतर विमानसेवा नसल्याने अविश्‍वास
- नवीन उद्योग व उद्योगांसाठी भूसंपादन
- अरबी समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणे
- नाशिक-सुरत, नाशिक-पुणे रेल्वेची पूर्तता
- बांधकाम व्यवसायाची कोंडी
- दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोरमध्ये नाशिकला स्थान मिळणे

2014 ची मतविभागणी
हेमंत तुकाराम गोडसे- (शिवसेना) 4,94,735 (विजयी)
छगन चंद्रकांत भुजबळ- (राष्ट्रवादी कॉंग्रेस) 3,07,399
डॉ. प्रदीप पवार- (मनसे) 63,050

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com