chagan bhujbal yewala water problem | Sarkarnama

येवल्यात पाण्यासाठी शेतक-याने तहसीलदारांसमोरच रचली स्वतःचीच चिता

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 डिसेंबर 2018

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर एका शेतकऱ्याला झोपवून प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली तर शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख झुंझार देशमुख यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने पोलिसांची एकच धावपळ उडाली. 

येवला : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर एका शेतकऱ्याला झोपवून प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली तर शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख झुंझार देशमुख यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने पोलिसांची एकच धावपळ उडाली. 

येवल्यात पाणीप्रश्‍न गंभीर बनला आहे. बोकटे येथील भैरवनाथ महाराज यात्रेसाठी आरक्षित पाणी पालखेड डावा कालव्याला सध्या सुरू असलेल्या आवर्तनातुन पाणी द्यावे ही मागणी मांडली जात आहे. प्रशासनाने मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर शेवटी कसाबसा यावर तोडगा निघाला. दोन वर्षांपासून आरक्षित असूनही बोकटे येथील यात्रेसाठी पिण्याचे पाणी देण्याला ठेंगा दाखवला आहे.त्यामुळे आता सोडलेल्या आवर्तनातून पाणी सोडावे ही मागणी शेतकरी करत आहेत.

याबाबत दोन आठवड्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदार, पाटबंधारे विभागाला निवेदन देऊनही दखल घेण्यात आली नाही. यामुळे शेतकऱ्यांनी तहसील कार्यलयावर प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. शेतकऱ्यांचा रोष इतका होता की लाकडाची चिता रचत संदीप देशमुख हे तिरडीवर झोपले होते. आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजप सर्वच पक्षाचे नेते आक्रमक होते. 

विभागीय अधिकारी भिमराज दराडे यांनी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता वैभव भागवत यांना तहसील कार्यलयात बोलवून घेतले. संतप्त शेतकऱ्यांनी भागवत याना दोष देत आक्रमक सवाल केले. शिवसेनेचे पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार,माजी तालुकाप्रमुख झुंझार देशमुख,जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले,बाजार समिती संचालक मकरंद सोनवने,शरद लहरे ,अमोल सोनवणे ,अरुण काळे,नारायनराव देशमुख ,प्रताप दाभाडे , महेश देशमुख आदींनी भागवत यांना जाब विचारला. 

यावेळी भागवत यांनी तालुक्‍याला यंदा एकूण दशलक्ष घनफुट पिण्यासाठी आरक्षित असून दशलक्ष घनफुट पाणी ते या वितारीकना सोडण्यात आले असून दशलक्ष घनफुट पिण्याचे पाणी उन्हाळ्यात देण्यात येणार असल्याची माहिती दिली.बोकटे यात्रेचे पाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशशिवाय सोडू शकत नसल्याचे भागवत यांनी सांगितल्यावर शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख झुंझार देशमुख यांनी पाणी द्या नाहीतर पेटून घेतो म्हणत अंगावरच रॉकेल ओतून घेतले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली. 

यानंतर दराडे यांनी संभाजी पवार ,महेंद्र काले ,बाबासाहेब डमाळे, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र परदेशी, महेश देशमुख, नारायणराव देशमुख, शरद लहरे ,शिवसेना तालुकाप्रमुख रतन बोरणारे ,कांतीलाल साळवे ,सुनील देशमुख ,अर्जुन कोकाटे ,अमोल सोनवणे आदींना चर्चेसाठी बोलाविले. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याशी प्रांत दराडे यांनी चर्चा केली,मात्र कुठलाही निर्णय झाला नाही.

यानंतर राष्ट्रवादीचे नेते अॅड. माणिकराव शिंदे यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा केली ,परंतु शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले नाही.आंदोलनात बापूसाहेब दाभाडे ,रामदास राऊत ,चेतन देशमुख ,श्रावण शिंदे ,दीपक वाकचौरे ,अजित सोनवणे , एकनाथ जाधव ,भारत देशमुख ,शेखर चाकणकर ,शिवाजी शिंदे ,कैलास दाभाडे ,बालनाथ गोसावी ,निवृत्ती बोर्डे ,अनिल बोराडे ,अमर लिंगायत ,संतोष देशमुख ,योगेश देशमुख ,मुकेश देशमुख ,शिवाजी देशमुख ,बाळू सोनार ,सचिन देशमुख ,दीपक देशमुख आदी शेतकरी सामील झाले.

पालकमंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक संदीप जाधव यांच्याशी प्रांत दराडे यांचे बोलणे डमाले यांच्या माध्यमातून झाले.एवढे सर्व होऊनही पाणी सोडण्याचा निर्णय सायंकाळ पर्यत झालेला नव्हता. यामुळे शेतकऱ्यांचा रोष अद्यापही कमी झालेला नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख