Chagan Bhujbal Wishes to Sharad Pawar on his birthday | Sarkarnama

पवार साहेबांच्या परीस स्पर्शाने अनेकांचं सोनं झालं : छगन भुजबळ 

छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री 
बुधवार, 12 डिसेंबर 2018

शरद पवार साहेबांच्या परीस स्पर्शाने अनेकांच्या जीवनाचे अक्षरशः सोनं झालं आहे. त्यांचं मार्गदर्शन, प्रोत्साहन ज्या ज्या व्यक्तींना लाभलं, ते राजकारण, समाजकारण, शिक्षण, उद्योग अशा कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात यशस्वी झाल्याचं आपल्याला दिसतं. मी त्यांच्या खांद्याला खांदा लावुन काम करु शकलो. त्यामुळे मी देखील त्यादृष्टीने नशीबवानच ठरलो - छगन भुजबळ

व्यक्तिशः पवार साहेबांबद्दल माझ्या मनात नेहमीच एक आगळावेगळा आदर राहिला आहे. एक दूरदृष्टीचा, व्यापक सामाजिक न्यायाची भूमिका जोपासणारा आणि राज्याच्या, समाजाच्या सर्वंकष विकासासाठी झटणारा नेता म्हणून मी त्यांच्याकडे नेहमीच पाहतो. पक्षीय आणि राजकीय भाग बाजूला ठेवून ओबीसी जनगणनेच्या मुद्यावर संसदेमध्ये जनमत संघटित करण्याच्या कामीही शरद पवार साहेबांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. 

निरनिराळ्या क्षेत्रांतील व्यक्तींची, संशोधनाची अद्ययावत माहिती ठेवणे ही पवार साहेबांची खासियत आहे. या माहितीचा उपयोग ते सभांमधून जनसामान्यांचे प्रबोधन करण्यासाठी करतात. देशपातळीवरील राजकारणात तसेच उद्योग, शिक्षण, कृषी, सहकार अशा विविध क्षेत्रांतील अद्ययावत माहितीचा खजिनाच त्यांच्याकडे असतो. या खजिन्यामुळे त्यांच्या उपस्थितीत झालेल्या अनेक बैठकांमध्ये भल्याभल्यांची दांडी उडालेली मी पाहिली आहे. 

आज या वयातही तरुणाईलाही लाजवेल, अशा उत्साहाने पवार साहेब रात्रंदिवस काम करत असलेले दिसतात. शरद पवार साहेब म्हणजे राजकारण, समाजकारण आदी क्षेत्रांत कार्यकर्तृत्व गाजविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या युवकांसाठी एक प्रेरणादायी दीपस्तंभच आहेत. फुले-शाहू-आंबेडकरांच्या या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा उदात्त आणि थोर सामाजिक दृष्टीकोन असणारा मुत्सद्दी नेता लाभला, ही बाब अभिमानास्पद आहे. त्यांना दीर्घार्युरारोग्य लाभो, हीच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा! 

महाराष्ट्राची खडान्‌खडा माहिती असणारे पवार साहेब म्हणजे राज्याच्या राजकारणातील प्राण आहेत. खेडोपाड्यातल्या आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही नावानिशी ओळखणारा असा हा एकमेव नेता आहे. आत्यंतिक परिश्रम, सातत्यपूर्ण प्रयत्न, विकासाची तळमळ आणि जिद्द हे त्यांचे स्थायीभाव आहेत. पराकोटीचा संयम ही तर त्यांची ख्यातीच आहे. कोणी कितीही तुटून पडलं, कितीही कडवट टीका झाली, तरीसुद्धा त्यांच्या मनावरील ताबा कधीही सुटला नाही, किंवा संयम ढळला नाही. निर्णयप्रक्रियेत महिला तसेच मागासवर्गीयांना सामावून घेण्यासाठी या दोन्ही वर्गांसाठी आरक्षण लागू केले. त्यामुळे आज सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, सहकारी संस्थांमध्ये या दोन्ही वर्गांना आपल्या आशा-आकांक्षा व्यक्त करण्यासाठी हक्काचं स्थान मिळालं आहे.
(शब्दांकन : संपत देवगिरे)  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख