Chagan Bhujbal Condolence Message | Sarkarnama

लोकशाहीची महती लक्षात घेऊन चालणारा महान नेता हरपला आहे - छगन भुजबळ

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

शिवसेना-भाजप युती व्हावी म्हणून प्रयत्न सुरु होते. मुंबईला भाजप कार्यकारिणी बैठक होती. त्यास खास बाळासाहेब ठाकरे यांना निमंत्रित केले होते. बाळासाहेब मला घेऊन त्या बैठकीस गेले होते. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांचे शब्द होते की ‘शिवसेना भाजप हे दोन पक्ष, शक्ती एकत्र आल्यावर चमत्कार घडवू’- छगन भुजबळ

नाशिक : एक कुशाग्र बुद्धिमान व समर्पित लोकनेता तसेच निस्वार्थी, निस्पृह आणि निष्णात राजकारणी, ख्यातनाम कवी, साहित्यिक, पत्रकार व खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे लोकशाहीची महती लक्षात घेऊन चालणारा महान नेता आज कायमचा हरपला असल्याच्या शोक भावना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे.

वाजपेयींबद्दल आपल्या आठवणी सांगताना भुजबळ म्हणाले, "शिवसेना-भाजप युती व्हावी म्हणून प्रयत्न सुरु होते. मुंबईला भाजप कार्यकारिणी बैठक होती. त्यास खास बाळासाहेब ठाकरे यांना निमंत्रित केले होते. बाळासाहेब मला घेऊन त्या बैठकीस गेले होते. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांचे शब्द होते की ‘शिवसेना भाजप हे दोन पक्ष, शक्ती एकत्र आल्यावर चमत्कार घडवू’ हे त्यांचे बाळासाहेबांस उद्देशून केलेल्या भाषणातील व्यक्तव्य. यावेळी ते म्हणाले की, ''बाळासाहेब आपके पास भुजबळ है और हमारे पास बुद्धिबळ है,"

"अटल बिहारी वाजपेयी हे माझे अतिशय आवडते वक्ते होते. विशेष म्हणजे लोकशाही संविधान या बाबतीत त्यांना विशेष आस्था-प्रेम होते. दि. ३ डिसेंबर २००३ साली पार्लमेंटच्या परिसरात महात्मा फुले यांचा पुतळा आपण उभा केला. त्याचे उद्घाटन सुद्धा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीच केले. त्यांच्या निधनामुळे लोकशाहीची महती लक्षात घेऊन चालणारा महान नेता आज हरपला आहे," असेही भुजबळ म्हणाले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख