#COVID2019 मुक्त उद्यासाठी आज एकमेकांपासून दूर रहा, घरीच रहा : छगन भुजबळ

कोरोना आजारावर सद्यस्थितीत जगात कुठलाही उपाय नाही, त्यामुळे त्यापासून बचावासाठी गर्दी व एकमेकांपासून दूर राहण्याची स्वयंशिस्त पाळा, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
Chagan Bhujbal Appeals People to Stay at Home
Chagan Bhujbal Appeals People to Stay at Home

नाशिक : कोरोना आजारावर सद्यस्थितीत जगात कुठलाही उपाय नाही, त्यामुळे त्यापासून बचावासाठी गर्दी व एकमेकांपासून दूर राहण्याची स्वयंशिस्त पाळा, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

कोरोना व जनता कर्फ्यूच्या पार्श्वभुमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आवाहन करताना म्हणाले, ''कोरोना विषाणूच्या विरुद्ध लढण्यासाठी सर्वजग उभे राहिले आहे. भारत देश आणि महाराष्ट्र सुद्धा त्यात मागे नाही. त्यावर अजून औषध सापडलेले नाही. चीन बरोबरच पाश्च्यात्य राष्ट्र  इटली व अमेरिकेत रोज शेकडो माणसे बळी पडत आहेत. जगातील अनेक राष्ट्र लाॅक डाऊन करण्यात आली आहेत. न्यूयॉर्क, लंडनमध्ये सुद्धा कुणालाही बाहेर  फिरू देत नाहीत. ग्रॉसरी शाॅप, मेडिकल मध्ये जायचे असेल तर एकाच माणसाने जायचे व पुन्हा घरात बसायचे. सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. आपण आता पहिल्या टप्प्याकडून कडून-दुसऱ्या टप्प्याच्या पुढे जात आहोत. पहिल्या टप्प्यात परदेशातून  येणारे लोक जे हे विषाणू घेऊन इथपर्यंत आले आहेत, त्यांचं क्वारंटाईन करणे, त्यांचे विलगीकरण करून त्यांना स्वतंत्र ठेवणे, या लोकांच्या संपर्कात जे लोक आलेत ते वाहनचालक असो किंवा इतर लोक हा दुसरा टप्पा झाला.''

''त्याच्यानंतर तिसरा टप्पा जो आहे सर्रासपणे आपल्या वस्त्यांमध्ये हा विषाणू पसरणे. अतिशय कठीण अतिशय धोकादायक असा हा टप्पा आहे. आजपर्यंत तरी यावर एकच मार्ग आहे, तो म्हणजे याच्या पासून दूर राहणे. ज्याला विषाणू बाधा झाली आहे त्याच्याशी संपर्क होऊ न देणे. या विषाणू बाधेतील लक्षण 14 दिवसानंतर दिसतात, या 14 दिवसात आपल्याला  लक्षात देखील येत नाही त्या व्यक्तीला विषाणू बाधा झाली आहे. आपण त्याच्याशी बोलतो, हातात हात घेतो, त्याच्या जवळ बसतो त्यावेळी तो प्रसार आपल्यालाही होऊन जातो. त्यामुळे एकमेकांपासून दूर राहणे, रस्त्यांवर गर्दी न करणे हा एकमेव मार्ग आपल्याकडे आहे,'' असेही यावेळी भुजबळ यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, "रेशन कार्डावर दोन महिने पुरेल एवढे अन्नधान्य देण्याचे ताबडतोब आदेश काढण्यात आले आहेत. मास्क आणि सॅनिटायझर हे देखील अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवांमध्ये आलेले आहेत. जे यात कुठल्याही गोष्चीचा काळाबाजार करताना सापडले तर त्याला सात वर्षांची शिक्षा होईल. अशा रितीने प्रत्येकाने स्वतःवरच बंधने घातली पाहिजेत. रेशन दुकानांवर ईपाॅज  मशीनची थंब इम्प्रेशन बंद करण्यात आली आहेत. कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणा देखील मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली आहे. ज्यांना बाधा झाली आहे त्यांना वेगळ्या ठिकाणी क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची व्यवस्था केली आहे. अशावेळी काही लोक परदेशातून येतात गुपचूप राहतात.''

माझी आपणा सर्वांना विनंती आहे की, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आपणास सातत्याने मार्गदर्शन करत आहेत, काही लोक त्याचा गंभीरपणे विचार करत आहेत, परंतु काही लोक अतिशय सहजपणे हे घेत आहेत. मंत्रालयात देखील 100 टक्क्यांवरून 50 टक्के व आतातर 25 टक्के माणसेच कामावर येत आहेत, असं केलं जाणार आहे. म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपल्याला रविवारी स्वतःहून संचारबंदी लागू करून  घ्यायची आणि लोकांपासून, गर्दीपासून दूर राहायचे असे सांगितले आहे. आपण सर्वांनी त्यात सामिल झाले पाहिजे,'' असे आवाहन त्यांनी केले.

''सर्व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे आदेशांचे काटेकोरपणे पालन आपण केले पाहिजे कारण यातून वाचण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे ही बाधा होऊ न देणे. पण झाल्यानंतर मात्र अतिशय कठीण परिस्थितीला सर्वांना सामना करावा लागेल. या आव्हानाला सर्वांनी प्रतिसाद द्या व स्वतःहून कर्फ्यू पाळा गर्दीमध्ये जाऊ नका, कार्यक्रम थांबवा, स्वच्छता पाळा आणि शासनाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करा,'' असेही आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

येवल्यात बाळगली खबरदारी

येवल्यासारख्या लहान शहरात देखील चार-पाच माणसे परदेशातून आलेली आहेत, त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना देखील या विषाणूचा त्रास होईल हे लक्षात घेऊन आज येवला पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहे. बाहेर देशातून आलेल्या लोकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशीही माहिती भुजबळ यांनी  दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com