मतदारसंघातील पाण्यासाठी छगन भुजबळांची चिखलात चार तास पायपीट

 मतदारसंघातील पाण्यासाठी छगन भुजबळांची चिखलात चार तास पायपीट

नाशिक : माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज आपल्या येवला मतदारसंघाच्या पाण्यासाठी चक्क दरसवाडी धरणापासून कालव्याने चार तास पंधरा मैल पायपीट केली. यावेळी मार्गात अनेक गावकऱ्यांनी त्यांच्याकडे कालव्यातील तांत्रिक त्रुटी व गळतीविषयी तक्रारी केल्या. त्याची खातरजमा करण्यासाठी श्री. भुजबळ अनेक ठिकाणी कालव्यात उतरुन त्याच्या नोंदी घेत होते. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्यात कार्यकर्ते, पदाधिकारी या पायपीटीने चांगलेच दमले. 

येवला मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्‍नावर गेली काही वर्षे राजकारण होत आले आहे. गेल्या महिन्यात श्री. भुजबळ यांच्या प्रयत्नातून साडे नऊ किलोमीटरचा मांजरपाडा- देवसाने हा बोगदा पुर्ण झाला आहे. त्यामुळे पाण्याविषयी आशा वाढल्या. याशिवाय यंदा चांगला पाऊस झला. त्यामुळे दरसवाडी धरणाचे पाणी कालव्याने येवला मतदारसंघात पोहोचावे यासाठी त्यांनी थेट दरसवाडी धरण गाठले. अधिकाऱ्यांकडून माहिती घेत असताना कालव्याबाबत कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे विविध तक्रारी केल्या. त्यानंतर त्यांनी दुपारी बाराला थेट दरसवाडी कालव्याने मार्गाने पाहणी करीत पायपीट सुरु केली. तिथे शक्‍य असेल तिथे मोटारीने तर अन्य ठिकाणी पायी फिरून त्यांनी माहिती घेण्यास सुरवात केली. काही ठिकाणी ते कालव्यात उतरुन गळती व त्यातील दोष पहात होते. त्याच्या नोंदी घेत होते. काही ठिकाणी त्यांना शक्‍य नसल्याने त्यांनी कार्यकर्त्यांना कालव्यात उतरायला लावले. 

दरसवाडी गाव, भाटगाव, परसुल, नारायणगाव, पोहेगाव, वडाळीभोई, खडक ओझर, डोंगरगाव या गावांतील शेतकऱ्यांनी त्यांना कालव्याविषयी अनेक तक्रारी केल्या. गळती व त्रुटी असल्याने हे पाणी येवल्यात पोहोचण्यात अनेक अडथळे असल्याचे निदर्शनास आले. याबाबत पाटबंधारे विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून व प्रशासनाकडून चुकीची माहिती दिली जात असल्याचे आढळले. हा विरोधाभासच दुष्काळी भागातील पाण्याच्या मार्गातील अडथळा असल्याने भुजबळांनी तेथून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी. दोषी अधिकाऱ्यांवर त्यांनी कारवाईच्या सूचना त्यांनी दिल्या. यंदा येवल्यात पाणी कसे पोहोचेल यावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. भुजबळ स्वतः कालव्याची पाहणी करीत असल्याने स्थानिकांनी त्यांच्याकडे धाव घेऊन तक्रारी केल्या. 

यावेळी डॉ. सयाजीराव गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकृष्ण सोनवणे, तुकाराम सोनवणे, सुकदेव जाधव, निवृत्ती घाटे, यु. के. आहेर, महेंद्रकुमार काले, मोहन शेलार, अरुण थोरात आदी पदाधिकारी या पाहणीत सहभागी झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com