विदर्भात एकवटलेले सत्ताकेंद्र पुन्हा मुंबईकडे सरकले

महाराष्ट्राच्या राजकारणावर असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्राच्या वर्चस्वाला मराठवाडा आणि विदर्भाने अधूनमधून आव्हान दिले होते. मुंबईत मात्र सत्तेचा वाटा दोन तीन मंत्र्यांच्या पुरता मर्यादीत असायचा. राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईकडे मात्र सत्तेच्या चाव्या कधीच नव्हत्या.
Center of Power in Maharashtra Shifted From Nagpur to Mumbai
Center of Power in Maharashtra Shifted From Nagpur to Mumbai

मुंबई  : मागील पाच वर्षात विदर्भातील नागपुरात एकवटलेले सत्ताकेंद्र मुंबईच्या दिशेने सरकले असून विधानसभे पाठोपाठ विधान परिषदेचे नेतृत्व मुंबईकडे आले आहे. विशेष म्हणजे विधीमंडळातील दोन्ही सभागृहातील चार महत्त्वाच्या पदांपैकी तीन पदे मुंबईतील नेत्यांकडे आली आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यामुळे राज्याला पहिल्यांदाच मुंबईतील मुख्यमंत्री मिळाले आहेत.

त्यापाठोपाठ आज विधान परिषदेतील सभागृह नेते म्हणून सुभाष देसाई यांची नियुक्‍ती शिवसेनेने केली आहे. तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांची नियुक्‍ती केल्याने सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांची पदेही आजी माजी शिवसैनिकाकडे आणि मुंबईकडे आली आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणावर असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्राच्या वर्चस्वाला मराठवाडा आणि विदर्भाने अधूनमधून आव्हान दिले होते. मुंबईत मात्र सत्तेचा वाटा दोन तीन मंत्र्यांच्या पुरता मर्यादीत असायचा. राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईकडे मात्र सत्तेच्या चाव्या कधीच नव्हत्या. महाविकास आघाडीचे सरकारमध्ये मोठेपणाचा मान शिवसेनेकडे आल्याने विधानसभेच्या मागोमाग विधान परिषदेच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा मानही मुंबईकडे आला आहे. 

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्‍ती झालेले प्रवीण दरेकर यांची राजकीय कारकिर्द शिवसेनेतून सुरू झाली असल्याने शिवसेनेविषयी त्यांचे असणारे ममत्व देखील त्यांनी आज केलेल्या भाषणातून व्यक्‍त झाले. विद्यार्थी आंदोलनात पोलिसांच्या लाठ्या पाठीवर पडल्या तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पाठीला मलम लावून दिल्याची आठवण त्यांनी काल विधान परिषदेतील नियुक्‍तीच्या भाषणावर बोलताना सांगितली.

मागच्या 20 वर्षात आघाडी सरकारच्या काळात कॉंग्रेसने चंद्रकांत हंडोरे, वर्षा गायकवाड, बाबा सिद्‌दीकी, नसीम खान यांना मंत्रीपदे दिली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने सचिन अहिर आणि नसीम खान यांना मंत्रीपद दिली होती. मागच्या सरकारमध्येही भाजपने विनोद तावडे, विद्या ठाकूर आणि शेवटच्या काही महिन्यात आशिष शेलार यांना मंत्रीपद दिली होती. तर शिवसेनेने सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांना मंत्रीपदे दिली होती. मात्र सत्तेच्या चाव्या मुंबईकडे नव्हत्या. मागच्या सरकारच्या काळात विदर्भाकडे सत्ताकेंद्र गेली त्यावेळी मुख्यमंत्रीपद, वित्त, उर्जा अशी महत्त्वाची खाती विदर्भाकडे होती. त्या अर्थाने मुंबईला कायम डावलले गेले होते.

संयुक्‍त महाराष्ट्र चळवळीत मुंबईतील नेत्यांच्या योगदानानंतरही मुंबईतील नेते संसदीय राजकारणात महत्त्वाच्या पदांवर अभावानेच दिसून आली आहेत. 1988 मध्ये ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्या होत्या, तर मनोहर जोशी 1990 मध्ये होते. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रमोद नवलकर 1991 आणि सुधीर जोशी 1993 आणि 2011 साली विनोद तावडे विरोधी पक्षनेते होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com