celebration of congress victory in kolhapur zp | Sarkarnama

भाजपच्या ताब्यातील झेडपीत काँग्रेसच्या विजयाचे सेलिब्रेशन

  सदानंद पाटील 
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

विजयाबददल पेढे वाटून आनंद साजरा केला.

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांची सत्ता असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांनी कॉंग्रेसच्या तीन राज्यातील विजयाबददल पेढे वाटून आनंद साजरा केला. यात भाजप, शिवसेना, ताराराणी आघाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या सदस्यांचा समावेश होता. भाजपची सत्ता असताना जिल्हा परिषदेत झालेल्या या जल्लोषाने भाजप नेते मात्र अस्वस्थ झाले आहेत.

जिल्हा परिषदेत असलेल्या अस्वस्थेतूनच हा प्रकार झाल्याची चर्चा गेले दोन दिवस जिल्हा परिषदेत सुरु आहे. 

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा परिषदेवर कमळ फुलले आहे. हे कमळ फुलवण्यासाठी ताराराणी विकास आघाडी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, चंदगड विकास आघाडीने व कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून निवडून येवून भाजप व महाडिक प्रेमाखातर अनुपस्थित राहिलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांचाही हातभार लागला आहे. जिल्हा परिषदेत भाजप आल्यामुळे सदस्यांना आणि ग्रामीण भागातील जनतेला अच्छे दिनची अपेक्षा होती. आयुष्यभर राजकारण करुनही पद न मिळणाऱ्यांना पद मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. मात्र सत्ता येवून दोन वर्षे होत आली तरी ना अपेक्षित निधी मिळाला, ना पद, यामुळे भाजपसह मित्र पक्षांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. 

भाजपच्या सत्तेत अस्वस्थ असलेल्या भाजप व मित्र पक्षांच्या सदस्यांचा कधी पार्टी मिटींगमध्ये तर कधी विभाग प्रमुखांच्या मिटींगमध्ये स्फोट झाला. मात्र या सदस्यांना 'कावळा नाका' मार्गे शांत करण्यात आले. मात्र ही शांतता फार काळ टिकणार नाही, हे दोन दिवसापूर्वीच्या घटनेनंतर स्पष्ट झाले आहे. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने भाजपचा पराभव झाला. या परभवाबददल कोल्हापूर जिल्हा परिषदेत मात्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या ताराराणी आघाडीचे राजू मगदूम यांना भाजपच्याच काही सदस्यांनी पेढे आणण्यास सांगितले. यानंतर येईल त्या सदस्यांना दिवसभर पेढे चारवण्यात आले. 

भाजपच्या पराभवाबददल आनंदोत्सव साजरा करणाऱ्यात सर्वपक्षीय सदस्यांचा समावेश होता. भाजपकडून अध्यक्षपदाचे दावेदार राहिलेले अरुण इंगवले, पक्षप्रतोद विजय भोजे, शिवसेनेचे उपाध्यक्ष पदासाठी दावेदार राहिलेले प्रवीण यादव यांच्यासह राष्ट्रवादीचे मनोज फराकटे, विजय बोरगे, जीवन पाटील, पांडुरंग भांदिगरे, कॉंग्रेसचे भगवान पाटील, यांनाही पेढे भरवण्यात आले. देशात, राज्यात जरी सत्ता असली तरी जिल्हा परिषदेत मात्र काही कामेच होत नसल्याची सर्वपक्षीय सदस्यांची तक्रार आहे. भाजपविरोधातील आनंदोत्सवाला ते ही एक महत्वाचे कारण आहे. 

घटक पक्षाच्या सदस्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. आम्हीही त्यात सहभागी झाला. लोकशाहीत सर्वांना मत व्यक्‍त करण्याचे स्वातंत्र्य आहे. मित्र पक्षांच्या मदतीनचे भाजपची सत्ता आली आहे. आम्ही त्यांच्या आनंदात सहभागी झालो, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि पक्षप्रतोद विजय भोजे यांनी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख