caste verification committee Mahaswamy's caste certificate may be revoked | Sarkarnama

डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र रद्द होण्याची शक्‍यता 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

खासदार महास्वामी यांनी जोडलेले बेडा जंगम हे जात प्रमाणपत्र बोगस आहे. बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र जोडून डॉ. महास्वामी यांनी निवडणूक लढवून जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर 420 प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि अनुसूचित जातीचा बनावट दाखला जोडल्याने त्यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल करावा, अशी मागणी आहे.

सोलापूर : सोलापूर लोकसभेचे खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांच्या बेडा जंगम जात प्रमाणपत्रावरील सुनावणी शनिवारी (ता. 15) पूर्ण झाली. या वेळी खासदारांच्या वकिलांनी दिलेले 12 अर्ज जात पडताळणी समितीने फेटाळून लावले. तक्रारदारांनी साक्षीदार पडताळणीचा दिलेला अर्जही नाकारला. बोगस जात पडताळणी प्रमाणपत्रावरील सुनावणी पूर्ण झाली असून आता टपालाद्वारे पडताळणी समितीने निकाल पोहच केला जाणार आहे. दरम्यान, जात पडताळणी समितीने सांगूनही महास्वामीजींनी तक्रारदारांने आक्षेप घेतलेली मूळ कागदपत्रे न दिल्याने भाजपला धक्‍का बसण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. 

खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांनी लिंगायत समाजातील बेडा जंगम असल्याचे जात प्रमाणपत्र निवडणुकीवेळी दिले होते. यावर आक्षेप घेत प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कंदकुरे यांनी जात पडताळणी समितीने दाखला तपासावा आणि खासदारांचे प्रमाणपत्र रद्द करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार जात पडताळणी समितीसमोर सुनावणी पूर्ण झाली. आता निकालावर हा खटला बंद झाला असून आगामी आठ दिवसात पडताळणी समिती निकाल जाहीर करणार आहे. दरम्यान, पडताळणी समितीने 31 जानेवारी 2019 व 1 फेब्रवारी 2020 रोजी तक्रारदारांनी आक्षेप घेतलेली मूळ कागदपत्रे द्यावीत, अशी शो कॉस नोटीस बजावली. मात्र, अद्यापपर्यंत महास्वामींनी मूळ कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे भाजपला निश्‍चितपणे धक्‍का बसेल, असा विश्‍वास तक्रारदारांनी व्यक्‍त केला आहे. 

उच्च न्यायालयात दाखल करणार याचिका 
उच्च न्यायालयात दाखल्यासंदर्भात पिटीशन दाखल करताना मूळ कागदपत्रे जोडली आहेत. त्यामुळे मूळ कागदपत्रे सादर करता आलेली नाहीत. दक्षता पथकाने नोंदवलेला अहवाल सकृतदर्शनी खोटा वाटतोय, नवे पथक नियुक्‍त करुन पुन्हा एकदा पुराव्यांची पडताळणी व्हावी, सध्याची जात पडताळणी समिती तक्रारदारांच्या दबावाखाली दिसत असल्याने नव्या जात पडताळणी समितीसमोर सुनावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आम्ही पुरावे सादर करण्यासाठी वेळ मागितला, अर्जही केले मात्र, पडताळणी समितीने ते फेटाळून लावल्याने आता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल असे डॉ. महास्वामी यांचे वकिल ऍड. संतोष न्हावकर यांनी सांगितले. 

खासदार महास्वामी यांनी जोडलेले बेडा जंगम हे जात प्रमाणपत्र बोगस आहे. बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र जोडून डॉ. महास्वामी यांनी निवडणूक लढवून जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर 420 प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि अनुसूचित जातीचा बनावट दाखला जोडल्याने त्यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल करावा, अशी मागणी आहे. तसेच खासदार डॉ. महास्वामी यांच्या वकिलांनी संगनमताने हे कारस्थान केल्याने त्यांचे वकिलपत्र रद्द करावे, अशीही मागणी केली जाईल. दाखला खरा होता तर जात पडताळणी समितीने मूळ कागदपत्रे सादर करण्यास सांगूनही त्यांनी का दिले नाहीत, असा प्रश्‍न आहे असे या प्रकरणाती तक्रारदार प्रमोद गायकवाड यांनी म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख