cash flow of gulabrao patil increases this way | Sarkarnama

गुलाबराव पाटलांचा `गल्ला` असा वाढला...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

....

जळगाव : विद्यार्थीदशेत काहीतरी अर्थार्जन म्हणून हॉटेल सुरू केले, पण चालायचे नाही.. मग हॉटेलात मांसाहारी पदार्थ सुरू केले.. हॉटेल चालू लागली, पण अपेक्षित पैसा मिळत नव्हता. मग, सिंघल साहेब कलेक्‍टर असताना त्यांनी परवाना दिला, हॉटेलला परमीट रूम केली.. आणि एका दिवसाचा चार हजारांचा "गल्ला' थेट 20 हजारांवर पोचला.. हे मी अनुभवातून सांगतोय.. असा अजब सल्ला पाणीपुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज तरुणांना दिला.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत विविध शासकीय योजनांच्या संदर्भात जिल्हास्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यास उपस्थित आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, महापौर भारती सोनवणे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, सीईओ डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके आदी उपस्थित होते. एकीकडे काही गावांमध्ये दारूबंदीसाठी महिला पुढे येत असताना खुद्द पालकमंत्र्यांनी असे विधान केल्याने त्याचे जिल्हाभरात पडसाद उमटू लागले आहेत.

केसीई सोसायटीच्या प्रांगणात आज सकाळी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याचे उद्‌घाटन गुलाबराव पाटलांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. त्यानंतर मेळाव्यात उपस्थित तरुणांना जोडधंदे करण्याबाबत मार्गदर्शन करताना गुलाबराव पाटील म्हणाले, आधी शुद्ध शाकाहारी हॉटेल भाड्याने घेतली, नंतर ती विकत घेतली. मात्र, ती चालेना. नंतर तिला मांसाहारी केली, मग थोडी चालू लागली. पण, मटण शिल्लक राहिलं की ते दुसऱ्या दिवशी ते खपेना. शेवटी तिला परमीट रूम केली. ज्या हॉटेलचा "गल्ला' मांसाहारी असताना 4 हजार होता, परमीट रूम केल्याबरोबर पहिल्याच दिवशी 20 हजार झाला. मध्यंतरी तो धंदा चालत नव्हता, तेव्हा वाटलं आपण फसलोय.. पण एकाने सांगितलं, हे कर.. ते कर. आपण राजकारणात आहे, कसं काय करायचा हा धंदा. पण, आपण नाही केला तर दुसरा तो धंदा करेल.. हे सांगताना पालकमंत्र्यांनी आमदार भोळेंचाही उल्लेख केला. एकदा असाही विचार केला की, आपलं हॉटेल रोडवर आहे, हायवेला आहे.. आपण करून तर बघूया.. तेव्हा सिंघल साहेब कलेक्‍टर असताना परमीट घेतले आणि धंदा सुरू केला आणि तो चांगलाच चालू लागला.. त्यामुळे तरुणांनी जोडधंदे केले पाहिजे, असा धक्कादायक सल्ला त्यांनी यावेळी दिला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख