Car race between Udayan Raje & Shivendrasinh Raje | Sarkarnama

शिवेंद्रसिंहराजे  - उदयनराजेंच्या कारची  तासवडे टोलनाक्‍यापासून  रेस 

उमेश बांबरे   
सोमवार, 17 डिसेंबर 2018

.

सातारा : तासवडे टोलनाक्‍यापासून साताऱ्याच्या दोन राजांच्या गाड्यांमध्ये रेस लागली. पुढे एका वळणावर मात्र, उदयनराजेंची गाडी सुसाट गेली, ती पुन्हा दहा किलोमीटर अंतरानंतरच ताफ्यातील गाड्यांना दिसली. 

शिवेंद्रसिंहराजेंच्या चालकाने गाडीचा वेग कमी ठेऊन आपला प्रवास सुरू ठेवला. साधारण उंब्रजपर्यंत चाललेल्या या रेसमध्ये कोण जिंकले कोण हरले?  यापेक्षा गाडी कोण चालवत होते, याची चर्चा परिसरातील ग्रामस्थांत रंगली होती. 

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे त्यांच्या कामासाठी रविवारी कऱ्हाड व कोल्हापूर दौऱ्यावर होते. साताऱ्याकडे परत येताना रात्री उंब्रजनजीकच्या तासवडे टोलनाक्‍यावर खासदार उदयनराजे येणार असल्याने एक लेन पूर्णत: रिकामी ठेवण्यात आली होती.

 रविवार असल्याने पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची टोलनाक्‍यावर मोठ्याप्रमाणात गर्दी होती. कोल्हापूरचा दौरा आटपून आमदार शिवेंद्रसिंहराजे हे देखील साताऱ्याकडे जाताना तासवडे नाक्‍यावर वाहनांच्या वर्दळीत होते. खासदार उदयनराजे भोसले याची गाडी टोलनाक्‍यावर येताच मोकळ्या लेनची बॅरेकेटस्‌ बाजूला काढली गेली. उदयनराजेंची गाडी पुढे जाताच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही त्यांच्या गाडीच्या मागे आपली गाडी रेटली. 

त्यानंतर दोन्ही वाहनांचा वेग पाहता, उदयनराजेंच्या ताफ्यातील अन्य वाहने जागेवरच थांबली. टोलनाक्‍याच्या पुढे दोन्ही नेत्यांच्या गाड्यांमध्ये रेस लागल्याचे चित्र सर्वांनी पाहिले. एका वळणावर मात्र, उदयनराजेंची गाडी सुसाट गेली ती पुन्हा दहा किलोमीटर अंतरानंतरच ताफ्यातील गाड्यांना दिसली. 

शिवेंद्रसिंहराजेंच्या चालकाने गाडीचा वेग कमी ठेऊन आपला प्रवास सुरूच ठेवला. साधारण उंब्रजपर्यंत चालेलेल्या या अलिखित रेस मध्ये कोण जिंकले कोण हरले. यापेक्षा गाडी कोण चालवत होते. याची चर्चा परिसरातील ग्रामस्थांमध्ये रंगली होती. दोन्ही राजेंची तासवडे टोलनाक्‍यापासूनची रेस ही आनेवाडी टोलनाक्‍याच्या घटनेला उजाळा देऊन गेली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख