तीन लाखांची लाच घेणारे शिवसेना नेते शिवाजी चुंभळेंचे सदस्यपद रद्द

तीन लाखांची लाच घेणारे शिवसेना नेते शिवाजी चुंभळेंचे सदस्यपद रद्द

म्हसरूळ : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, शिवसेनेचे शिवाजी चुंभळे यांचे बाजार समितीचे सदस्यत्व रद्द झाले आहे. कंत्राटी कामगारास कायम करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याने त्यांना अटक झाली होती. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) नुसार समिती सदस्यपदाचा दुरुपयोग केल्यामुळे त्यांना बाजार समितीच्या सदस्यपदावरून काढून टाकण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी दिले. 

चुंभळे हे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 26 जुलै 2015 ला झालेल्या निवडणुकीत समिती सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यांची 20 जुलै 2017 ला बाजार समितीच्या सभापतिपदी निवड झाली होती. 16 ऑगस्ट 2019 ला त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले होते. पंचवटी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली. त्याची घरझडती करताना त्यांच्याकडे विदेशी मद्य आढळल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यांना 20 ऑगस्ट 2019 ला अटक केली. या प्रकरणानंतर जिल्हा उपनिबंधकांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. 

बाजार समितीच्या विरोधी गटाच्या संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करीत राज्य कृषी उत्पन्न पणनच्या कायद्यानुसार एखाद्या लोकसेवकाला गुन्हेगारी कृत्यात 48 तासांपेक्षा जास्त कालावधीत अटक झालेली असल्यास, तो धारण करीत असलेल्या पदावरून तो निलंबित करण्याची तरतूद आहे, हे निदर्शनास आणून देत चुंभळे यांना सदस्यपदावरून कमी करण्याचे मागणी केली होती. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या नोटीसबाबत चुंभळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निदेशाचे पालन करण्यात येईल, असेही जिल्हा उपनिबंधकांनी आदेशात म्हटले आहे. 

उच्च न्यायालयात जाणार - शिवाजी चुंभळे 
जिल्हा उपनिबंधक कार्यालयात शनिवारी ही सुनावणी झाली होती. त्याचा अहवाल पणन मंडळाला पाठविणे आवश्‍यक आहे. मात्र तत्पूर्वीच सदस्यपद रद्द केल्याचा आदेश काढण्यात आला. या विरोधात आपण उच्च न्यायालयात जाणार आहे असे शिवाजी चुंभळे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com