उदय सामंत भाजपचा रथ रोखण्यात यशस्वी होणार का ?

पालकमंत्री सामंत आणि खासदार राऊत यांची राजकीय केमिस्ट्रीही चांगली आहे. याचा विचार करता नव्या पालकमंत्र्यांसमोर विकासात्मक निर्णयाबरोबरच संघटनात्मक आव्हाने मोठी आहेत. त्यांची पहिली कसोटी येत्या जिल्हा बॅंक निवडणुकीत लागणार आहे.
Narayan-Rane-Uday-Samant-
Narayan-Rane-Uday-Samant-

सावंतवाडी :  माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रवेशाने ताकद वाढलेल्या भाजपला थोपवण्याचे आव्हान शिवसेनेचे नवे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमोर असेल. शिवसेनेचे कोकण हे नाक मानले जाते. ते राखून पक्षाची संघटनात्मक मान उंचावण्यात ते किती यशस्वी ठरतात हे येणारा काळच ठरवणार आहे; मात्र हीच गरज ओळखून त्यांना रत्नागिरी ऐवजी सिंधुदुर्गचे पालकमंत्रिपद दिल्याचे मानले जात आहे.


शिवसेना आणि राणे यांचे राजकीय वैर संपण्याची चिन्हे नाहीत. यातच राणेंनी शिवसेनेचा प्रमुख स्पर्धक असलेल्या भाजपत प्रवेश केला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात गेल्या काही काळात शिवसेनेने चांगले बस्तान बसवले आहे. यात रत्नागिरीतील त्यांचे संघटनात्मक वर्चस्व कायम आहे; मात्र राणेंच्या भाजप प्रवेशाने सिंधुदुर्गात धक्के बसू लागले आहेत.


 गेल्या महिन्याभरात सरकार स्थापनेनंतर झालेल्या तीन मोठ्या पोटनिवडणुका शिवसेनेने गमावल्या. यात माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांचा गड असलेल्या सावंतवाडी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. हे धक्के शिवसेनेच्या कमजोर संघटनात्मक बळामुळेच झाले. शिवसेनेतील या संघटनात्मक कमजोरी जाणून घ्यायच्या झाल्यास थोडे मागे जावे लागेल.


नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर सिंधुदुर्गात हा पक्ष पूर्णतः शक्तीहीन झाला होता. तत्कालीन विधान परिषद आमदार व विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गाच्या राजकारणात लक्ष घातल्यानंतर शिवसेना पुन्हा उभारी घेऊ लागली. नवे कार्यकर्ते, पदाधिकारी या पक्षाकडे येऊ लागले. याच दरम्यान सत्ताधीश असलेल्या राणेंबद्दलच्या निगेटीव्ह मतांची संख्या वाढू लागली. या मतांचे बळ शिवसेनेला मिळू लागले.


 2014 च्या लोकसभा निवडणुकीत याचे दृश्‍य परिणाम म्हणून विनायक राऊत यांनी डॉ. नीलेश राणे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पुढच्या विधानसभेत सावंतवाडीतून शिवसेनेच्या तिकिटावर दीपक केसरकर आणि कुडाळात जिल्हाप्रमुख वैभव नाईक विजयी झाले. 


पालकमंत्रिपद केसरकरांकडे आले. अनुकूल स्थिती असूनही पुढच्या पाच वर्षांत सत्ता असताना संघटनात्मकदृष्ट्या अपेक्षित काम झाले नाही. जिल्हाप्रमुख असलेल्या नाईक यांनी मालवण व कुडाळ तालुक्‍यांचा समावेश असलेल्या मतदारसंघापलीकडे फारसे लक्ष दिले नाही. केसरकर यांच्याकडे मंत्रिपद असल्यामुळे त्यांना मतदारसंघातही संघटनात्मक कामाकडे फारसे लक्ष देता आले नाही. 


युतीच्या जागा वाटपात कणकवली भाजपकडे असल्याने त्या मतदारसंघाला कोणी वालीच नव्हता. त्यामुळे 2014 च्या लोकसभा, विधानसभा विजयानंतर झालेल्या बहुसंख्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राणेंचे वर्चस्व राहिले. शिवसेनेकडे सत्ताबळ असले तरी गावपातळीपर्यंतची संघटना विस्कळीत झाली. 


निवडणुकांमध्ये प्रभागवार मते कमी-जास्त पडली तरी जाब विचारणारी किंवा शाबासकी देणारी व्यवस्था हरवली. काही भागात सक्षम पदाधिकाऱ्यांचा अभावही ठळकपणे जाणवू लागला. असे असूनही शिवसेनेचा मोठ्या निवडणुकांमध्ये विजय आणि स्थानिक स्वराज्य संस्थात पराभव हा पॅटर्न कायम राहिला. 


याचे कारण म्हणजे राणेंची वैयक्तीक समर्थकांची  वोट बॅंक सिंधुदुर्गात मोठी आहे. याचबरोबर राणेंची निगेटीव्ह वोटची संख्याही जास्त आहे. मोठ्या निवडणुकीत शिवसेना भाजपची मते आणि राणेंविषयीची निगेटीव्ह मते एकत्र येऊन शिवसेनेला विजय मिळवून द्यायची; मात्र लहान निवडणुकांत निगेटीव्ह मतांचा प्रभाव कमी व्हायचा व राणेंची संघटनात्मक फळी विजय मिळवून द्यायची. राणेंच्या भाजप प्रवेशामुळे ही गणिते बदलली आहेत. 


भाजपची मते शिवसेनेकडून वजा होऊन राणेंकडे गेली आहेत. ही वाढलेली मते राणेंच्या निगेटीव्ह वोट बॅंकेपेक्षा जास्त आहेत. यामुळे संघटनात्मक ताकद मजबूज झाली नाही तर शिवसेनेला सिंधुदुर्गात पुढच्या निवडणुका जड जावू शकतात. यासाठी शिवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ताकद निर्माण करावी लागणार आहे. हे करण्यासाठी खमका पालकमंत्री आणि संघटनात्मक पुनर्बांधणीशिवाय पर्याय नाही.


पालकमंत्रिपद सामंत यांना देताना कदाचित शिवसेनेने याचा विचार केला असावा. कारण इथल्या पालकमंत्री पदासाठी आदित्य ठाकरे आणि ऍड. अनिल परब यांची नावे चर्चेत होती; मात्र मुंबईतून नवख्या नेतृत्वाला इथली संघटना हाताळणे तितकेसे सोपे नव्हते. रत्नागिरीत शिवसेनेला मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे सामंत यांना मूळ जिल्हा न देता सिंधुदुर्गची जबाबदारी दिली गेल्याचे मानले जात आहे.

कार्यकर्त्याला सक्षम करणारा नेता
श्री. सामंत मुळात राष्ट्रवादीच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते. त्यांचे राणेंशी सख्य होते; मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राणे आणि श्री. सामंत यांच्यात वितुष्ट निर्माण व्हायला सुरूवात झाली. पुढे सामंत राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. 
गेल्या काही वर्षात रत्नागिरीत खरी राजकीय लढाई राणे विरुद्ध सामंत अशीच पहायला मिळाली. यात बऱ्याचदा सामंत सरस ठरले. कार्यकर्त्याला सक्षम करणारा नेता, अशी सामंत यांची रत्नागिरीत ओळख आहे. शिवाय ते मूळ मठ (ता. वेंगुर्ले) येथील आहेत. त्यामुळे स्थानिकत्वाचा मुद्दाही राहत नाही.

पहिली कसोटी जिल्हा बॅंक निवडणूक
सध्या भाजपकडे जिल्ह्यात नारायण राणे आणि माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, अशा दोन प्रमुख राजकीय शक्ती आहेत. सर्व नितींचा वापर करून निवडणूक जिंकण्याचे तंत्र या दोन्ही नेत्यांकडे आहे. 
शिवाय शिवसेनेचे नाक असलेल्या कोकणात पाय पसरण्यासाठी भाजप हवी ती ताकद द्यायला तयार आहे. याला शह देण्यासाठी शिवसेनेलाही तशाच कार्यशैलीची, नेतृत्वाची गरज होती.

पालकमंत्री सामंत आणि खासदार राऊत यांची राजकीय केमिस्ट्रीही चांगली आहे. याचा विचार करता नव्या पालकमंत्र्यांसमोर विकासात्मक निर्णयाबरोबरच संघटनात्मक आव्हाने मोठी आहेत. त्यांची पहिली कसोटी येत्या जिल्हा बॅंक निवडणुकीत लागणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com