निलंगेकर - पवार संघर्षात दानवेंची शिष्टाई यशस्वी ठरेल ? 

जिल्हा परिषदेच्या 58 सदस्यांत धीरज देशमुख आमदार झाल्यामुळे त्यांचे एकुरगा गटाचे एक पद रिक्त आहे. उर्वरित 57 सदस्यांत भाजपचे 35, कॉंग्रेसचे 14, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाच, अपक्ष दोन व शिवसेनेचा एक असे संख्याबळ आहे. यातील दोन्ही अपक्षांचा भाजपला पाठिंबा असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांचा आहे.
Nilangekar-Pawar-Danve
Nilangekar-Pawar-Danve

लातूर  : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या सोमवारी (ता. सहा) होणाऱ्या निवडीत भाजपने ताक फुंकून पिण्यास सुरवात केली आहे. दोन सदस्यांनी बंड केल्यामुळे महानगरपालिकेतील भाजपची सत्ता गेली. 


जिल्हा परिषदेत त्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून भाजपच्या प्रदेश शाखेने अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची सूत्रे स्वतःकडे घेतली आहेत. यातूनच केंद्रीय राज्यमंत्री व पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी रविवारी (ता. पाच) येथे येत आहेत. 

त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे.


जिल्हा परिषदेच्या 58 सदस्यांत धीरज देशमुख आमदार झाल्यामुळे त्यांचे एकुरगा गटाचे एक पद रिक्त आहे. उर्वरित 57 सदस्यांत भाजपचे 35, कॉंग्रेसचे 14, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाच, अपक्ष दोन व शिवसेनेचा एक असे संख्याबळ आहे. यातील दोन्ही अपक्षांचा भाजपला पाठिंबा असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांचा आहे. 


स्पष्ट बहुमत असले तर राज्यात झालेले सत्तांत्तर तसेच जिल्ह्याला मिळालेल्या दोन मंत्रिपदांमुळे भाजपने सतर्कता बाळण्यास सुरवात केली आहे. कोणत्याही स्थितीत फाटाफूट होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. 


त्याची पहिली सुरवात भाजपने सदस्यांसाठी व्हीपही काढल्याचीही माहिती पुढे येत आहे. महानगरपालिकेत भाजपला बहुमत असतानाही दोन सदस्यांनी बंडखोरी करत कॉंग्रेसला साथ दिली. या सदस्यांना पक्षातील कोणत्या नेत्याने पाठबळ दिले, हे आता लपून राहिलेले नाही. 


यामुळेच विधानसभा निवडणुकीपासून जिल्ह्यातील भाजपची उरलीसुरली ताकद कमी होऊ लागली. जिल्ह्यात पक्षामध्ये अनेक गट आहेत. मात्र, सध्या आमदार संभाजी पाटील निलंगेकर व आमदार अभिमन्यू पवार यांचा गट तेजीत आहे. महापालिकेप्रमाणे याचा फटका जिल्हा परिषदेत बसू नये म्हणून दानवे रविवारी येथे येत आहेत. 


त्यांच्या उपस्थितीत हॉटेल कार्निवलमध्ये सकाळी अकरा वाजता सदस्यांची बैठक होणार आहे. बैठकीत ते सदस्यांना मार्गदर्शन करून अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्‍यता आहे. त्यांच्यासोबत प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक व मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख उपस्थित राहणार आहेत. बैठकीच्या माध्यमातून पक्षातील दुफळी टाळून जिल्हा परिषदेची सत्ता कायम ठेवण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.

भाजप जिल्हाध्यक्षांचीही निवड

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या सोमवारी निवडी झाल्यानंतर दुपारी भाजप शहर व ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षांची निवड होणार आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी लातूर ग्रामीणचे नेते रमेशअप्पा कराड यांचे नाव आघाडीवर आहे. 


त्यांच्यासोबत ऍड. भारत चामे यांचेही नाव चर्चेत आहे. शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी सुधीर धुत्तेकर, शैलेश गोजमगुंडे, गुरुनाथ मगे व देविदास काळे यांची नावे आघाडीवर आहेत. जिल्हाध्यक्षपद देऊन कराड यांची विधानसभा निवडणुकीत झालेली नाराजी दूर करण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचेही सांगण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com