शिवतारे आणि भेगडे यांच्या पराभवामुळे राहुल कुलांना लाल दिवा मिळणार?

पुणे शहरातून चंद्रकांत पाटील हेच राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करतील. माधुरी मिसाळ यांचेही नाव अग्रभागी!
शिवतारे आणि भेगडे यांच्या पराभवामुळे राहुल कुलांना लाल दिवा मिळणार?

पुणे : राज्यातील नव्या मंत्रीमंडळात पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मंत्र्यांच्या संख्येत एकने कपात होणार आहे. त्यामुळे राज्याच्या आगामी मंत्रीमंडळात शहर व जिल्ह्यातील दोनच मंत्री असणार आहेत. यामध्ये एक कँबीनेट आणि एका राज्यमंत्र्यांचा समावेश असेल.

महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचा एकही आमदार निवडून न आल्याने, या पक्षाच्या कोट्यातील एक मंत्रीपद पुणे जिल्ह्याऐवजी अन्य जिल्ह्यात जाण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. विजय शिवतारे आणि बाळा भेगडे यांच्या पराभवामुळे जिल्ह्यात राहुल कुल यांना मंत्रिपद मिळणार का, याची उत्सुकता आहे. त्यांना मंत्री बनविण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी प्रचारसभेत दिला होता. दुसरीकडे पुणे शहरातून कोथरूडचे आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मंत्रीपद निश्चित असल्याने शहरातून इतर कोणाला संधी मिळणार, याची चर्चा सुरू आहे. यात महिला म्हणून माधुरी मिसाळ यांचे नाव अग्रभागी आहे. 

विधान परिषदेवरील सदस्य किंवा पराभूत उमेदवाराला मंत्री पदावर संधी न देण्याची मागणी सेनेच्या एका गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या तरी सेनेच्या कोट्यातील मंत्रीपदाचा पेच निर्माण झाला आहे.         सद्यस्थितीत सेनेकडे पुणे शहरातील डॉ. नीलम गोऱ्हे या एकमेव आमदार आहेत. परंतु त्या विधान परिषदेच्या आमदार असून, त्यातही त्यांच्याकडे सध्या विधान परिषद उपाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे गोऱ्हे यांचे नाव पुणे जिल्ह्यातील मंत्रीपदाच्या स्पर्धेत येते की नाही, याबाबत शंका असल्याचे जिल्ह्यातील एका सेना नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

मावळत्या मंत्रिमंडळात जिल्ह्यात तीन मंत्रिपदे होती.  भाजपचे दोन पैकी एक कॅबिनेट, एक राज्यमंत्री आणि सेनेचा एक राज्यमंत्री अशी तीन मंत्रीपदे होती. भाजपच्या कोट्यातील कॅबिनेट मंत्रीपद तत्कालीन आमदार आणि विद्यमान खासदार गिरीश बापट यांना देण्यात आले होते. दोन राज्यमंत्री पदापैकी प्रत्येकी एक पद भाजप व सेनेला देण्यात आले होते. मावळत्या विधानसभेतील  सेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांना जलसंधारण तर, भाजपचे कँटोन्मेंट मतदारसंघाचे आमदार दिलीप कांबळे यांना सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री करण्यात आले होते. पुढे बापट हे लोकसभेवर निवडून गेल्याने त्यांनी आमदारकी आणि मंत्रीपदाचा राजीनामा दिला. कांबळे यांच्याकडील मंत्रीपद काढून घेऊन, ते मावळचे भाजप आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांना देण्यात आले होते. सेनेने मात्र पाचही वर्षे विजय शिवतारे यांच्याकडेच मंत्रीपद कायम ठेवले होते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवतारे आणि भेगडे या दोन्ही राज्यमंत्र्यांचा पराभव झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com