Can Prashant Kishor unite Shiv Sena BJP ? | Sarkarnama

 शिवसेना- भाजपची युतीचा तिढा प्रशांत किशोर सोडवणार का ? 

मृणालिनी नानिवडेकर 
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

राहू की जावू ,उजवे की डावे , ते की आपण, सत्तेच्या दालनात का विरोधाच्या मैदानात अशा दुविधेत सापडलेल्या शिवसेनेला सल्ला दयायला प्रशांत किशोर नावाच्या राजकीय पंडितांचा महाराष्ट्रात प्रवेश झाला आहे.प्रशांत किशोर म्हणजे काही साधीसुधी आसामी नव्हेत.ते राजतिलकाची तयारी करणारे कारागिर, पुरोहित आहेत.

मुंबई : मोदींना बहुमत गाठता येणार नाही अशी चर्चा सुरू आहे, 90 -100 जागा कमी झाल्या तर काय याची चर्चा सुरू असताना प्रशांत किशोर यांचे सत्तेच्या सारीपाटावर आगमन झाले आहे.गैरकॉंग्रेसी पण भाजपशी जवळिक असलेल्या पक्षांची मोट बांधून नितीशकुमारयांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीत दाखल करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यासाठी त्यांनी शिवसेनेशीही संपर्क साधला आहे. 

स्वयंघोषित सल्लागार,इतिहास घडवण्याचा दावा करणारे ईमेजमेकर्स आजकाल पावलोपावली भेटतात. प्रशांत किशोर अशा उपटसुंभांपैकी एक नाहीत. ठीक पाच वर्षांपूर्वी याच काळात चाय पे चर्चा घडवत एका चहावाल्याला पंतप्रधान करण्यासाठी ते झटत होते.त्यानंतर जे घडले तो इतिहास आहे. अर्थातच अशा यशस्वी कर्त्याधर्त्याशी नंतर बऱ्याच मंडळींनी संपर्क साधला.

ते बडयांचे सल्लागार झाले.नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवल्यामुळे कॉंग्रेसनेते राहुल गांधी त्यांना सल्ला मागू लागले.किशोर यांना सकल नेत्यांना शहाणे करण्याचा पंथ आवडत असावा कारण ते तेथेही गेले. मग कॅप्टन अमरिंदरसिंगांशी काहीकाळ गुफ्तगू करून ते पुन्हा मोदीजींच्या दरबारात आले.तेथून किंवा कसे ते माहित नाही पण ते बिहारात गेले.सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पक्षात क्रमांक दोनचे नेते आहेत. 

पक्षाची ,नेत्यांची कुंपणे त्यांच्यासारख्या प्रतिभासंपन्नाला साहत नसल्याने ते सर्वदूर संचार करीत सर्वपक्षीय संपर्क करत असतात. नुकतेच ते शिवसेनला सल्ला दयायला मुंबईतले सर्वात महत्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या मातोश्रीवर जावून आले.एनडीएतील सेनेचे स्थान बळकट करायला ते गेले की जागा वाढवण्याचा सल्ला दयायला की मुख्यमंत्री कसे व्हावे याच्या युक्‍त्या सांगायला ते माहित नाही पण ते बांद्रयाला जावून आल्यावर सेनेतील हवशा नवशा गवशांमध्ये चर्चेचे उधाण आले आहे. 

भाजपवर कितीही टिका केली तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांचे सख्खे मित्र आहेत असे सांगितले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या चतुरंगसेनेचे दलपती अध्यक्ष अमित शहा यांना युतीबाबतची उदधव ठाकरे यांची मते दस्तुरखुदद फडणवीस स्वत:च सांगत असतात. भाजपतील बडी मंडळीही युतीचे काय चालू आहे हे केवळ चौघांनाच माहित आहे असे खाजगीत मान्य करत असताना अचानक किशोर यांचा प्रवेश झाला आहे.

शिवसेनेतील निवडून आलेली एकनाथ शिंदे यांच्यासारखी मंडळी सामनाकार खासदार संजय राउत यांच्या प्रस्थानेच अस्वस्थ असल्याची चर्चा असतानाच एक नवाच अमराठी मातोश्रीत पोहोचला आहे. आपण युतीचे कर्तेधर्ते आहोत असे त्यांना दाखवायचे आहे की स्वत:चे प्रस्थ वाढवत काम मिळवून घ्यायचे आहे ते अदयाप स्पष्ट झालेले नाही.कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी जागावाटपासारखे अवघड प्रश्‍न सोडवत निर्णयापर्यंत पोहोचली असताना शिवसेना आणि भाजपत नेमके काय सुरू आहे ते अदयाप स्पष्ट नाही. 

शिवसैनिकांचा जीव या सत्तेत रमला नव्हताच पण भाजपलाही सत्ता राखण्यासाठी सुरू असलेली सेनेची मनधरणी आता नकोशी वाटते आहे. मतदाराला पर्याय नसतो हे मान्य पण सतत भांडणाऱ्यांची युती जनता मान्य करते काय हा प्रश्‍न राजकारण्यांना पडत नाही काय ? सत्तेसाठी काहीही चालते असे या गटाला वाटते.असो.

हिंदुत्ववादी शिवसेनेचा अयोध्येतील राममंदिराबाबतचा निर्णय ठाम आहे मात्र नरेंद्र मोदींना पाठिंबा दयायचा की नाही याबाबत निर्णय मात्र व्हायचाच आहे.मोदींच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याची चर्चा सर्वदूर सुरू आहे. त्यामुळे एनडीएमधल्या घटक पक्षांच्या मागण्या वाढत आहेत. हे स्वाभाविक आहे. मांडलिकत्वाला नकार देण्याचा सेनेचा बाणा. त्यामुळे अंभीराजाच्या धर्तीवर मला राजासारखे वागवा असे सेना ठासून सांगते आहे. पूर्वी तर स्वबळावर लढण्याचा ठराव झाला होता पण आता काहीसे नमते धोरण स्वीकारले गेले आहे की काय अशा शंकेला वाव आहे. 

भाजपचा सहवास नको आहे पण सत्तेचा सुवास तर हवा आहे.बाहेर पडण्याचा मार्ग सेनेच्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या मंत्र्यांनी अदयाप अनुसरलेला नाही.काय करायचे याबाबत सेनेत दोन गटतट आहेत असे ऐकिवात आहे.एखादा पक्ष दोलायमान परिस्थितीत असेल तर सल्ला देणाऱ्यांमध्ये अहमहिका लागते. शिवसेनेतले उभय गट दररोज पक्षप्रमुख उद्‌धव ठाकरेंना काहीतरी सांगत असतात म्हणे.गेला बाजार एनडीए आणि युपीएतील काही मंडळीही सेना आपल्यासमवेत असावी यासाठी सक्रीय आहेत.या दोन बाजूंऐवजी प्रशांत किशोर नवाच प्रस्ताव घेवून आल्याचीही चर्चा आहे.

गैर भाजप, गैरकॉंग्रेसी अशा तिसऱ्या आघाडीसाठी किशोर प्रयत्न करत आहेत असे म्हणतात.त्यांची पत,प्रतिष्ठा आणि विश्‍वासार्हता खरोखरच तेवढी आहे काय हा प्रश्‍न.मोदींऐवजी नितीशकुमार यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे म्हंटले जाते.बिहारमध्ये अर्ध्याहून जास्त मतदारसंघ पदरात पाडून घेणारे नितीशकुमार थेट मोदींना आव्हान देणार काय याबददल कुणीही ठाम बोलत नाही. ठाकरे पितापुत्र मागे मातोश्रीबाहेर पडून ममता बॅनर्जी यांना भेटून आले होतेच. ते पर्यायाचा विचार करत असतीलही. 

पण मुळात शिवसेनेबददलचे सध्याचे वातावरण काय आहे ? सेना सत्तेत राहून पर्याय उभा करू शकते काय ? नेत्यांना भान नसले तरी जनता असा विचार करतेच. प्रशांत किशोर सेनेला मुख्यमंत्री होण्याची नीती आखून देतील पण जनतेतील धारणा कशी बदलू शकतील? युक्‍त्या सुचवणे म्हणजे सत्तेची चावी सुपूर्द करणे नव्हे. किशोर यांना सत्तेच्या अवतीभवती वावरणे आवडते , ते थेट मोदींना आव्हान देतील? सेना भाजपतील तणावाचा फायदा घेत स्वत:चे (नसलेले ) महत्व वाढवायचा हा प्रयत्न तर नसेल? 

भाजप जनमताबददल सावध दिसते,सेनेचे काय ? सामनातील लिखाण  पाहिले तर  शिवसेनेला युती करण्याची इच्छा  नाही हे सरळ दिसते आहे.अशा परिस्थितीत कॉंग्रेसला विरोध पण भाजपपासून काहीसे दूर रहाण्यासाठी नितीशकुमार यांच्या आघाडीत दाखल होण्याचा प्रस्ताव समोर आला असावा. नितीशकुमार यांचा मंदिराला पाठिंबा आहे काय ? शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर ते किती जागा जिंकतील हाही प्रश्‍न आहे.अर्थात स्वबळावर लढून प्रत्येक मतदारसंघात शक्‍ती वाढवता येईल हे निश्‍चित आहे. वेगळे होण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेला प्रशांत किशोर यांची भेट महत्वाची वाटत असणार हे निश्‍तिच.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख