प्रवरा भागातील  विखेंची  हक्काची मते  विरोधकांना फोडता येतील का ? 

सावळिविहीर ते पिंपरी निर्मळपर्यंत निवडणूक कधी कधी चुरशीची होते. बाभळेश्वरपासुन पुढे ती एकतर्फी होते.प्रवरा परिसरातील हक्काच्या मतांमुळे विखेंपुढे विरोधक हतबल होतात, असे आजवरचे चित्र राहिले.
Radhakrishn-Vikhe
Radhakrishn-Vikhe

शिर्डी :  शिर्डी विधानसभा मतदारसंघ विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे  पाटील यांचा  बालेकिल्ला समजला  जातो. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राज्यात सर्वाधिक मतांनी विजय संपादन केला.त्यापूर्वीची निवडणूक मात्र चुरशीची झाली. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचे विरोधक आतापासूनच कामाला लागले असून  प्रवरा भागातील  विखेंची  हक्काची मते  विरोधकांना फोडता येतील का ? हा महत्वाचा प्रश्न आहे . 

मतदारसंघात त्यांना दृश्य स्वरूपात विरोधक नाही. मात्र अपवाद वगळता प्रत्येक निवडणूक रंगतदार होते.हा या मतदार  संघाचा इतिहास आहे. २००९ च्या निवडणुकीत काॅंग्रेसच्या विखे पाटील यांच्या विरोधात शिवसेनेकडून डाॅ. राजेंद्र पिपाडा उभे होते. त्यावेळी १५ हजार मतांनी आघाडी घेवून विखे पाटील विजयी झाले होते. डाॅ. पिपाडा यांचा पराभव झाला असला, तरी विखेंच्या मतांच्या जवळ त्यांनी मते मिळविण्यात यश मिळविले होते.   

मागील २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे यांच्या राष्ट्रवादीचे शेखर बोऱ्हाडे, शिवसेनेचे अभय शेळके, भाजपचे राजेंद्र गोंदकर हे प्रमुख पक्षाकडून उमेदवार उभे होते. अर्थातच सर्वांत जास्त मते मिळवून विखे पाटील यांनी बाजी मारली होती.

आजवर विखे पाटील सत्ताधारी आमदार  किंवा मंत्री म्हणून निवडणुकीला सामोरे  गेले. या वेळी ते विरोधीपक्ष नेते आहेत. त्यामुळे सरकारच्या विरोधातील  नकारात्मक मतांचा फटका त्यांना  बसणार नाही. प्रस्थापितांच्या विरोधात असलेली  मते विरोधकाच्या  पारड्यात  जातात. त्याचे प्रमाण किती यावर निवडणुकीची रंगत अवलंबून असते.

आगामी विधानसभेलाही हिच परिस्थिती  राहील. जनसंपर्क, बुथनिहाय कार्यकर्त्यांची फौज आणि निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेली अनुभवी यंत्रणा या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. सावळिविहीर ते पिंपरी निर्मळपर्यंत निवडणूक कधी  कधी  चुरशीची होते. बाभळेश्वरपासुन  पुढे  ती एकतर्फी होते.प्रवरा  परिसरातील हक्काच्या मतांमुळे विखेंपुढे विरोधक  हतबल  होतात, असे आजवरचे  चित्र राहिले.

नित्याचा संपर्क, संस्थेचे पाठबळ व यंत्रणा असलेला  विरोधक  मतदारसंघात नाही.मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर  स्वार होत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे खासदार  झाले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत विखे  पाटील विक्रमी मताधिक्क्याने विजयी झाले. संपर्क , संघटना  आणि बलाढ्य यंत्रणेच्या जोरावर हे शक्य  झाले.

या निवडणुकीत देखील  हिच स्थीती  कायम रहाण्याची शक्यता नाकारता येत  नाही. भाजप सेनेची युती झाली, तर शिवसेनेने संधी दिल्यास  कमलाकर कोते  विरोधकांचे  उमदेवार असतील. युती  झाली  नाही तर भाजपाकडून राजेंद्र गोंदकर  इच्छुक आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com