`अजित पवारांचा प्रचार अघोरी`

..
ajit pawar-chandrarao taware
ajit pawar-chandrarao taware

माळेगाव ः साखर कारखानदारीत आमूलाग्र बदल झाल्यास उसाला जादा भाव मिळू शकतो, हे राज्यात सर्वप्रथम "माळेगाव'ने सिद्ध केले. विस्तारीकरण झाल्यानंतर विक्रमी भाव, उसाचे वेळेवर गाळप, डिस्टलरी व वीज प्रकल्प चांगले चालले असताना अजित पवार भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून मतदारांना भुलवितात; तर स्वतःच्याच कार्यकर्त्यांना सालगड्याप्रमाणे दमबाजी करतात. त्यांच्या अशा अघोरी प्रचाराला बळी न पडता मतदारांनो "किटली' चिन्हावर शिक्का मारा आणि त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे प्रमुख चंद्रराव तावरे यांनी केले.

माळेगाव कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने पणदरे (ता. बारामती) येथे सहकार बचाव शेतकरी पॅनेलच्या प्रचाराच्या सांगता सभेत उमेदवार चंद्रराव तावरे बोलत होते. ते म्हणाले, ""राज्यात अनेक सहकारी साखर कारखाने काही नेतेमंडळींनी कवडीमोल किमतीत विकत घेतले; परंतु सहकार टिकविण्याचे आव्हान स्वीकारत "माळेगाव'ने सातत्याने सभासदांना उच्चांकी दर दिला. रविवारी होणाऱ्या निवडणुकीत "किटली' या चिन्हाला बहुमताने पसंती दिल्यास सभासद मतदारराजाच्या कष्टाचे मोल होणार आहे. बारामतीमधील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक संपन्नता आणि त्याच्या सामाजिक जीवनातील मूलभूत बदल घडवून आणण्यासाठी आम्ही 35 वर्षांपेक्षा अधिक काळ काम केले. हे सभासद कदापि विसरणार नाही.''

अध्यक्ष रंजन तावरे म्हणाले, ""माळेगावने सभासदांना दिलेले एफआरपीपेक्षा अधिकची रक्कम, सरकारने ठरवून दिल्यानुसार कामगारांना नियमित वेतन, कारखान्यात राबविलेले आधुनिक तंत्रज्ञान, कर्जाची परतफेड आणि कमी कालावधीतील विस्तारीकरण या चांगल्या बाबी विचारात घेता, या कारखान्याला विविध चार पुरस्कार मिळाले. पवारसाहेब अध्यक्ष असलेल्या "व्हीएसआय' संस्थेने तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार "माळेगाव'ला दिला. 2017 मध्ये अजितदादांच्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने "माळेगाव'च्या प्रशासनाला "शरद पवार सहकार गौरव पुरस्कार' देऊन गौरविले. त्यामुळे पवारांना माळेगावच्या कारभारावर कशी टीका करू वाटते, हेच कळत नाही.''

दरम्यान, ""दादा, तुम्ही बारामती तालुक्‍याचे आमदार म्हणून विक्रमी मतांनी निवडून आलात. त्यामुळे नीरा डावा कालव्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला, त्याबद्दल आनंदच आहे. ते तुमचे कर्तव्यच आहे,'' असे सांगून रंजन तावरे यांनी "कर नाही त्याला डर कशाची', अशा शब्दांत चौकशीच्या मुद्यावर भाष्य केले.

छत्रपती कारखान्याबाबत गौप्यस्फोट...
यंदा "छत्रपती'च्या कार्यक्षेत्रातील अनेक सभासदांबरोबर चक्क पवार कुटुंबीयांबरोबर अध्यक्ष प्रशांत काटेंच्या परिवारातील सदस्यांनी माळेगाव कारखान्याला ऊस देऊन विश्वास दाखविला. "छत्रपती'ची एवढी वाईट अवस्था झाली आहे की जिल्हा बॅंक, बारामती सहकारी बॅंक कर्ज देण्यास तयार नाही. शेवटी या कारखान्याला आपल्याच कामगार व शिक्षक पतपेढीतून कर्ज उचलण्याची वेळ आली आहे, असा गौप्यस्फोट रंजन तावरे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com