campagen parbhani | Sarkarnama

प्रचारासाठीच्या तयार झेंड्यामुळे परभणीत स्थानिकांच्या रोजगारावर गदा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 एप्रिल 2017

परभणी : निवडणुकीत उमेदवारांना विविध साहित्य खर्च करावा लागतो. साहित्याशिवाय निवडणूक अपूर्ण असते. त्यातील झेंडा हा एक घटक महत्त्वाचा आहे. झेंड्यावरून उमेदवार आणि त्यांच्या पक्षाची ओळख पटते. सध्याच्या डिजिटलच्या जमान्यात रस्त्यावरील कारागिरांकडून झेंडे शिवून घेण्याचे प्रमाण घटले आहे. थेट पक्ष कार्यालयातून साहित्य एकगठ्ठा येत असल्याने स्थानिकांच्या रोजगारावर गदा आली आहे. 

परभणी : निवडणुकीत उमेदवारांना विविध साहित्य खर्च करावा लागतो. साहित्याशिवाय निवडणूक अपूर्ण असते. त्यातील झेंडा हा एक घटक महत्त्वाचा आहे. झेंड्यावरून उमेदवार आणि त्यांच्या पक्षाची ओळख पटते. सध्याच्या डिजिटलच्या जमान्यात रस्त्यावरील कारागिरांकडून झेंडे शिवून घेण्याचे प्रमाण घटले आहे. थेट पक्ष कार्यालयातून साहित्य एकगठ्ठा येत असल्याने स्थानिकांच्या रोजगारावर गदा आली आहे. 
निवडणुकीत झेंडे, बिल्ले. रुमाल, बॅनर या साहित्याची रेलचेल असते. त्याशिवाय निवडणुकीचे रंगढंग दिसत नाहीत. पूर्वी झेंडे, रुमाल हे स्थानिक कारागिरांकडून तयार करून घेतले जात होते. आजही तसे कारागीर शहरात आहेत. परंतु वाढता डिजिटलचा प्रभाव पाहता सर्व साहित्य हे थेट मोठ्या कारखान्यात तयार होऊन येत आहे. निवडणूक कोणतीही असो पक्ष कार्यालयाकडून एकगठ्ठा सर्व उमेदवारांना पोचते केले जात आहे. त्यामुळे उमेदवाराला असे साहित्य तयार करण्यास झटावे लागत नाही. 
परभणीत शिवाजी चौकातील दर्ग्याजवळ गेल्या तब्बल 80 वर्षांपासून देशपांडे घराणे झेंडे तयार करण्याचे व्यवसाय करतात. अन्य कपड्यांची किरकोळ शिवणकाम देखील होते. त्यात झेंडे बनवणे हा प्रमुख व्यवसाय. यंदा महापालिका निवडणुकीत त्यांना केवळ एका पक्षाचे झेंडे तयार करण्याचे काम मिळाले आहे. मुंबईहून अन्य सर्वच पक्षाच्या कार्यालयांनी साहित्य पुरविल्याने परभणीत झेंडे, रुमाल तयार करण्याचे काम राहिले नाही. एक उमेदवारांला किमान एक हजार झेंडे लागतात. दहा रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत झेंडे उपलब्ध असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. 
शहरात प्रचार साहित्य तयार करणारी 15 ते 20 दुकाने लागली आहेत. त्यांच्याकडे केवळ बॅनर, पोस्टर बनविले जात असल्याचे दुकानदार सांगत आहेत. झेंडे व रुमाल उमेदवारांना पक्षाकडून पुरविले जात असल्याने त्याचा फटका बसला आहे. शिवसेना सोडली तर अन्य सर्व पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचार साहित्याची सोय थेट मुंबईतून केली आहे. केवळ अपक्ष उमेदवारच परभणीत प्रचार साहित्य तयार करत असल्याचे चित्र आहे. 
रेडिमेड झेंड्यामुळे परिणाम 
उमेदवारांना तत्काळ आणि रेडिमेड झेंडे पाहिजे असल्याने त्यांचा ओढा रेडिमेड साहित्याकडे लागला आहे. त्यामुळे आमच्या व्यवसायाला मरगळ आली असल्याचे परभणीतली झेंडा विक्रेते बाळासाहेब देशपांडे यांनी सांगितले 

स्थानिक व्यवसायाला फटका 
डिजिटल दुकानातून केवळ बॅनर आणि स्टिकर मागितले जात आहेत. उमेदवारांना त्यांच्या पक्षाकडून साहित्य पुरवले जात असल्याने स्थानिक व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे परभणीतील डिजिटल व्यावसायिक अरुण टाक यांनी सांगितले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख