Cabinet expansion will take place after 21 December : Hasan Mushriff | Sarkarnama

मंत्रीमंडळ विस्तार 21 डिसेंबरनंतर होईल : हसन मुश्रीफ 

   वि.म. बोते 
मंगळवार, 3 डिसेंबर 2019


 पवार साहेबांनी माझी नी उध्दवसाहेबांची ओळख करुन दिली. माझी त्यांची पाहिलीच भेट. शिवेसेनेचा नेता कसा असेल याबद्दल माझी उत्सुकता होती. पण पहिल्या भेटीत हा माणूस फारच सज्जन असल्याचे दिसून आले. इतका सज्जन माणूस मी बघितला नाही. भाषण आणि आदेशावर त्यांची चांगली कमांड आहे. -हसन मुश्रीफ

कागल  : पाच वर्षे सत्तेबाहेर राहिल्याने काय होते हे आम्ही अनुभवले आहे. सेनेची कळ काढण्याची ताकद भाजपामध्ये नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कितीही आरडाओरड केली तरी हे सरकार पाच वर्षे नक्की टिकेल असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. 

मंत्रीमंडळ विस्तार 21 डिसेंबरनंतर होईल असे सांगून ऊस बिले, कर्जमाफी आणि महापूरातील नुकसान भरपाई मिळवून देत नाही तोपर्यंत स्वस्थ  बसणार नाही. असे त्यांनी सांगितले.

येथील शाहू सभागृहात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, सभापती राजश्री माने, नगराध्यक्षा माणिक माळी, प्रविणसिंह पाटील, उपनगराध्यक्ष आनंदा पसारे, मनोज फराकटे, नवीद मुश्रीफ आदींची उपस्थिती होती.

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, निवडणूक निकालाचे आकडे पाहिल्यावर आम्हाला विरोधात बसावे लागेल असे वाटत होते. परंतु शिवसेनेचे खासदार संजय राऊत व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या भेटीगाटी सुरु झाल्या आणि वातावरण बदलत गेले. भाजपा अध्यक्ष अमित शहा व शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्यातील गुप्त बैठकीतील निर्णय फिसकटला होता.

पवार साहेबांनी सेनेकडून विषय सोडवून घेतला आणि सोनिया गांधीची भेट घेतली. तेथेच सत्तेचे समीकरण जुळले.  उध्दव ठाकरे यांचे म्हणणे शिवसैनिक पालखीत बसायला पाहिजे असे होते. पवार साहेबांनी त्यांना समजावून सांगितले नंतर ते तयार झाले. आमचे सरकार पाच वर्षे नक्की टिकेल ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्वागत प्रकाश गाडेकर यांनी केले. यावेळी नगरसेविका मंगल गुरव, माधवी मोरबाळे, पं.स. सदस्य जयदिप पोवार, कृष्णात पाटील आदींसह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख