मंत्रिमंडळाचा विस्तार 21 डिसेंबरनंतरच 

मंत्रिमंडळाचा विस्तार 21 डिसेंबरनंतरच 

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 21 डिसेंबरनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, नागपूरचे हिवाळी अधिवेशन सहा मंत्र्यांवरच चालविण्यात येणार आहे. 

शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीत मंत्रीपदाचे वाटप निश्‍चित झालेले असले, तरी खातेवाटपाची चर्चा सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधे उपमुख्यमंत्री पदासाठी नेत्याचे नाव अंतिम झालेले नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार हे स्पष्ट झाले आहे. 

दरम्यान, कॉंग्रेसने पक्षश्रेष्ठींकडून मंत्रिपदे व मिळणारी खाती यावर सहमती मिळवली आहे. कॉंग्रेसकडून मुंत्रपदाची शपथ घेणाऱ्यांची यादीदेखील तयार आहे. मात्र, राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवार यांनाच आग्रह केला असून, त्यांचे मन वळविण्याची तयारी सुरू आहे. अजित पवार पक्षाच्या कामात सक्रिय झाले असले, तरी मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबत ते अद्याप तयार नसल्याचे सांगण्यात येते. 

मात्र, पक्षातील सर्व नेते व आमदार यांना अजित पवार मंत्रिमंडळात हवे असून, त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. नागपूर येथे 16 डिसेंबरपासून या महाविकास आघाडी सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. केवळ पाच दिवस हे अधिवेशन सुरू राहणार असून, सहा मंत्र्यांवरच कामकाज उरकण्याचा भार राहणार आहे. विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांत या सहा मंत्र्यांनाच विरोधकांचा सामना करावा लागेल. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने त्यांच्यासमोर विरोधी पक्षाचे आव्हान आहे. याअगोदर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी 1978 ला पुलोद आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर केवळ चार मंत्र्यांवरच हिवाळी अधिवेशन घेतले होते. त्यामुळे, दोन्ही सभागृहांचे कामकाज करण्यात या सहा मंत्र्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा केला जात आहे.  


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com