Buldana ZP | Sarkarnama

बुलडाणा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी कमळाला घड्याळाची साथ? 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 17 मार्च 2017

बुलडाणा जिल्हा परिषदेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मिळून सत्ता समीकरण बनण्याची चिन्हे आहेत.

बुलडाणा : राज्यात भाजप-शिवसेनेत सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाचे लोण जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही पाहायला मिळत आहे. बुलडाणा जिल्हा परिषदेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मिळून सत्ता समीकरण बनण्याची चिन्हे आहेत. हाच पॅटर्न संपूर्ण राज्यभर राबवून शिवसेनेला जिल्हा परिषदेच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून होण्याची शक्‍यता आहे. 

राज्यात सध्या शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेला आहे. महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत "एकला चलो रे'चा नारा देत भाजपने या निवडणुकांमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे "या ना त्या' कारणाने शिवसेनेकडून भाजपला लक्ष करण्यात येत असून भाजपकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर मिळत असल्याने युतीमध्ये धुसफूस वाढली आहे. राज्यस्तरावरील नेत्यांमधील ही धुसफूस ग्रामीण भागापर्यंत पोचली असून शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी सोयीच्या युत्या करण्यावर भाजपने भर दिला आहे. 

बुलडाणा जिल्हा परिषदेत सध्या भाजपचे 24 आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 8 असे मिळून सत्तेचे बहुमताचे बत्तीस सदस्यांचे गणित जुळण्याची दाट शक्‍यता आहे. यासंदर्भात आमच्याकडे सगळे पर्याय खुले असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी दिल्याने सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी सोयीची भूमिका घेतली आहे. शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याच्या दृष्टीने भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मिळून बहुमताचे गणित जुळविण्याच्या मानसिकतेत दोन्ही पक्षांचे नेते आहेत. मात्र, येत्या दोन दिवसांत राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय नेत्यांशी चर्चा करून भूमिका स्पष्ट होईल, अशी चिन्हे आहेत. 

सिंदखेडराजा पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपने हातात हात घेतल्याने या भूमिकेला पुष्टी मिळाली आहे. राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी आमच्याकडे सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितल्याने हे समीकरण नक्की जुळणार आहे. बुलडाण्यात राबविण्यात येत असलेला हा पॅटर्न संपूर्ण राज्यभर राबवून शिवसेनेच्या दबावाच्या राजकारणाला भाजपकडून प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्‍यता आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख