बुलडाणा जिल्हा : 'वंचित' हाच आघाडीसमोरचा चिंतेचा विषय

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज्यस्तरावर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये समेटाचे संकेत दिसत नाहीत. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीतील मोदी लाट आणि वंचित बहुजन आघाडीमुळे झालेल्या मतविभाजनाच्या फटक्‍यातून अजूनही कॉंग्रेस सावरलेली नाही. त्यामुळे वंचितमुळे बसणारा फटका कसा दूर करायचा, हाच आघाडीसमोर चिंतेचा विषय आहे.
बुलडाणा जिल्हा : 'वंचित' हाच आघाडीसमोरचा चिंतेचा विषय

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीतील नरेंद्र मोदी लाट आणि वंचित बहुजन आघाडीमुळे झालेल्या मतविभाजनाच्या फटक्‍यातून अजूनही कॉंग्रेस सावरलेली नाही. याची पुनरावृत्ती विधानसभेत झाल्यास कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीचे पानिपत व्हायला वेळ लागणार नाही, हे सांगण्यासाठी कुण्या भविष्यकाराची गरज नसल्याची राजकीय परिस्थिती जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे 'वंचित'मुळे बसणारा फटका कसा दूर करायचा, हाच आघाडीसमोर चिंतेचा विषय आहे; तर भाजप-शिवसेना युतीच्या गोटात लोकसभेतील यशाने आनंदीआनंद आहे. उमेदवारीसाठी गर्दी आहे. 

बुलडाणा जिल्ह्यामध्ये सात विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये घाटाखालील खामगाव, जळगाव जामोद व मलकापूर मतदारसंघांवर भाजपचा वरचष्मा आहे. मेहकर व सिंदखेडराजात शिवसेनेची मजबूत पकड, तर बुलडाणा व चिखलीमध्ये कॉंग्रेसचे आमदार आहेत. असे असले तरी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे आमदार असलेल्या बुलडाणा व चिखलीमध्ये विद्यमान खासदारांना मिळालेले मताधिक्‍य 23 ते 25 हजारांपेक्षा जास्त आहे.

भाजपच्या ताब्यातील जळगाव जामोद व खामगाव मतदारसंघात हा आकडा 35 हजारांवर आहे. यावरून या मतदारसंघांमध्ये भाजपची मोदी लाट किती चालली, हे लक्षात येते. याला दुसरी बाजू अशीही आहे, की कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या पीछेहाटीमागे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळालेली मतेदेखील कारणीभूत आहेत. एक लाख 33 हजार मतांनी खासदार प्रतापराव जाधव विजयी झालेत. त्याच वेळी वंचितचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांना एक लाख 72 हजारांपेक्षा जास्त मते मिळालीत. 

सध्याची राजकीय स्थिती पाहता राज्यस्तरावर कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये समेटाची शक्‍यता दिसत नाही. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीची उमेदवारी म्हणजे हमखास आमदारकी, या विश्वासात आज युतीचे इच्छुक आहेत. खामगाव, मलकापूर व जळगाव जामोदमध्ये अनुक्रमे आमदार आकाश फुंडकर, आमदार चैनसुख संचेती आणि कॅबिनेट मंत्री डॉ. संजय कुटे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. शिवाय, सिंदखेडराजा व मेहकरमध्ये शिवसेनेचेच विद्यमान आमदार असल्याने त्यांचीही उमेदवारी पक्‍की आहे. 

आता प्रश्‍न फक्‍त बुलडाणा व चिखली या दोन मतदारसंघांचा आहे. हे दोन्ही मतदारसंघ कॉंग्रेसच्या ताब्यात असून, या ठिकाणी युतीसाठी इच्छुकांची संख्या भरपूर आहे. त्यातही बुलडाण्यामध्ये शिवसेनेत, तर चिखलीमध्ये भाजपसाठी नेत्यांच्या रांगा आहेत. 

आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात विद्यमान आमदारांनी कामाला सुरवात केली आहे. भेटीगाठी, मेळावे, बैठका, महाजनादेश यात्रा, आदित्य ठाकरेंची संपर्क यात्रा या माध्यमातून वातावरणनिर्मितीचे प्रयत्न आहेत. बुलडाणा व चिखली हे मतदारसंघ कुणाला सुटतात, हेच अद्याप अनिश्‍चित आहे. या दोन्ही मतदारसंघांत भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांचे किमान पाच-पाच इच्छुक कामाला लागलेले आहेत. या दोन मतदारसंघांतील कॉंग्रेसचे विद्यमान आमदारही दांडगा जनसंपर्क ठेवून आहेत. आपण केलेली विकासकामे ते जनतेसमोर मांडण्यासाठी प्रत्यक्ष जनसंपर्काच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com