buldana bjp | Sarkarnama

बुलडाणा जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 14 मार्च 2017

बुलडाणा जिल्ह्यातील तेरा पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने जोरदार मुसंडी मारत चार पंचायत समित्यांचे सभापती आणि सहा उपसभापतीपदे ताब्यात घेतली आहेत.

अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील तेरा पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने जोरदार मुसंडी मारत चार पंचायत समित्यांचे सभापती आणि सहा उपसभापतीपदे ताब्यात घेतली आहेत. विशेष म्हणजे कॉंग्रेसच्या ताब्यात असलेली खामगाव पंचायत समिती भाजपने ताब्यात
घेतल्याने माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांना पुन्हा कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी जोरदार झटका दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

बुलडाणा जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांसाठी सोळा फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीची मतमोजणी तेवीस फेब्रुवारी रोजी झाली. विद्यमान सभापती
व उपसभापती यांचा कार्यकाळ तेरा मार्च रोजी संपुष्टात आला. त्यानुसार ता. 14 रोजी पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडून आलेल्या
सदस्यांमधून निवड करण्यात आली. त्यामध्ये काही सभापती व उपसभापती ईश्वर चिठ्ठीने निवडण्यात आले. 

जिल्ह्यात भाजपने चार पंचायत समित्यांची सत्ता ताब्यात घेतली असून त्यामध्ये खामगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, मलकापूर पंचायत समित्यांमध्ये सभापती व
उपसभापती पदावर भाजपचेच सदस्य विजयी झाले आहेत. तर चिखली, सिंदखेडराजा पंचायत समितीमध्ये उपसभापती पदही ताब्यात घेतले आहे. जिल्ह्यात या
निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाची पीछेहाट झाली असून केवळ चिखली, बुलडाणा, मोताळा, नांदुरा पंचायत समितीचे सभापती पद मिळविण्यात कॉंग्रेसला यश आले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने देऊळगाव राजा पंचायत समितीचे सभापती व उपसभापती पद ताब्यात घेतले असून लोणार पंचायत समितीमध्ये शिवसेनेशी हातमिळवणी करत
उपसभापती पद मिळविले आहे. भारिप बमसंने शेगाव पंचायत समितीमध्ये सभापती व उपसभापती पद मिळवीत एकहाती सत्ता स्थापन केली असून बुलडाणा पंचायत
समितीमध्ये कॉंग्रेसशी हातमिळवणी करीत उपसभापती ताब्यात घेतले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख