budhajirao mulik | Sarkarnama

बुधाजीरावांच्या सत्काराकडे उदयनराजेंची पाठ ! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 एप्रिल 2017

उदयनराजेंनी 2009 ची लोकसभा निवडणूक लढविण्यापुर्वी डॉ. बुधाजीराव मुळीक यांना बरोबर घेऊन शेतीप्रश्‍नावर काम सुरू केले होते. काही आंदोलने त्यांनी केली, त्यात उदयनराजेंसह डॉ. मुळीक यांना तुरुंगात बसावे लागले होते. उदयराजेंनी ती निवडणूक जिंकली. नंतरही ते खासदार झाले, मात्र त्यांच्या यशाचा पाया त्या
शेतकरी आंदोलनाने घातला. 

पुणे : कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करून संसदेत पोचलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले डॉ. मुळीक यांच्या सत्कारसोहळ्याला स्वागताध्यक्ष असूनही उपस्थित राहिले नाहीत. लोणंद (सातारा) येथील खंडणीप्रकारणामुळे ते कार्यक्रमापासून दूर राहिल्याची चर्चा आहे. 

डॉ. मुळीक यांचा अमृतमहोत्सवी सत्कार बालरंगमंदिरात झाला. कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष डी. वाय पाटील प्रकृती अस्वास्थ्यामुळे आले नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दिल्लीला महत्त्वाची बैठक असल्याने आले नाहीत. त्यांनी व्हिडीओद्वारे शुभेच्छा दिल्या. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वागताध्यक्ष असूनही उदयनराजे कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. 

संसदेचे अधिवेशन सुरू असताना खंडणीप्रकरणी उदयनराजे व सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचे सहकारी अजून तुरुंगात आहेत. उदयनराजेंनी केलेला अटकपूर्व जामिनाचा अर्जही फेटाळण्यात आला आहे. त्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी मुदतही न्यायालयाने दिलेली नाही. साताऱ्यात अटक होण्याच्या शक्‍यतेने
ते अज्ञातस्थळी आहेत. भाजपच्या वरिष्ठांच्या ते संपर्कात आहेत. या घडामोडी सुरू असतानाच त्यांना डॉ. मुळीक यांच्या सत्कार सोहळ्याचे स्वागताध्यक्षपद देण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी त्यांची पोस्टर्सही लावण्यात आली होती. मात्र उदयनराजे काही मिनिटांसाठीही आले नाहीत. दरम्यान, ते कां आले नाहीत, याची माहितीही कार्यक्रमात कुणी दिली नाही. 

डॉ. मुळीक यांनी मात्र मुलाखतीदरम्यान त्यांचा उल्लेख केला. बाळासाहेब ठाकरे आणि उदयनराजे भोसले ही खरी माणसे भेटल्याचे त्यांनी सांगितले. 2008 ला उदयनराजे भेटले, त्यांनी खासदार व्हायच आहे, असे स्पष्ट सांगत त्यादृषृटीने शेतीचे मार्गदर्शन मागितले होते. ताकाला जाऊन मोगा लपविणारे ते नाहीत, असेही मुळीक म्हणाले. 

या कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, आमदार उल्हास पाटील, आमदार जगदीश मुळीक, माजी आमदार उल्हास पवार, माजी आमदार पाशा पटेल, माजी आमदार मोहन जोशी, आदी उपस्थित होते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख