अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार; सीएए आणि एनपीआरप्रश्नी आघाडीतील मतभेदांवर विरोधकांचा भर

महिला अत्याचाराच्या प्रकरणात झालेली वाढ, शेतकरी कर्जमाफी, आधीच्या सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा लावलेला सपाटा आदी मुद्यांवरून परवा, सोमवारपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत
Budget Session of Assembly may to Stormy
Budget Session of Assembly may to Stormy

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारचे पहिलेच पूर्ण वेळ अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत असून हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्‍यता आहे.

महिला अत्याचाराच्या प्रकरणात झालेली वाढ, शेतकरी कर्जमाफी, आधीच्या सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा लावलेला सपाटा आदी मुद्यांवरून परवा, सोमवारपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. सीएए आणि एनपीआरप्रश्नी आघाडीतील मतभेद स्पष्टपणे समोर आल्याने आघाडीत अंतर पाडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाण्याची शक्‍यता आहे. शिवाय अधिवशेनात एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगावच्या चौकशीचा मुद्दा गाजण्याची शक्‍यता आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पहिला अर्थसंकल्प या अधिवेशनात सादर होईल. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्र येत किमान समान कार्यक्रमाच्या आधारे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे 6 मार्च रोजी मांडल्या जाणाऱ्या सन 2020-21 या वर्षाच्या अर्थसंकल्पात किमान समान कार्यक्रमाचे प्रितबिंब पडेल, अशी अपेक्षा आहे. सरकारी तिजोरीत खडखडाट असताना सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे.

अलिकडे राज्यभरात महिला अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. हिंगणघाटमध्ये तरूण शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्यात आले. नाशिक, पनवेल, औरंगाबाद मध्येही अशाच स्वरूपाच्या घटना घडल्या. या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारने शेतकरी कर्जमाफीची योजना जाहीर केली असली तरी त्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही. कर्जमाफीच्या योजनेत अनेक शेतकरी अपात्र ठरणार असल्याचा विरोधी पक्षाचा दावा आहे. त्यामुळे महिला अत्याचार आणि शेतकरी कर्जमाफीच्या मुद्दा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपस्थित होण्याची शक्‍यता आहे.

सीएए, एनपीआरवरून आघाडीत धुसफूस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर उध्दव ठाकरे यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचे (एनपीआर) समर्थन केल्याने आघाडीत धुसफूस वाढली आहे. अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून आघाडीत अंतर वाढविण्याची भाजपची रणनीती आहे. एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगावच्या तपासावरून आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

भाजपची कोंडी करण्यासाठी अहवाल मांडणार

सत्ताधारी पक्षाने भाजपची कोंडी करण्यासाठी फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील चौकशी अहवाल अधिवेशनात मांडण्याची तयारी केली आहे. भाजप नेते एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, पंकजा मुंडे, सुभाष देशमुख आदींच्या विरोधात झालेल्या चौकशीचे अहवाल मांडून विरोधी पक्षाला शह देण्याचा प्रयत्न आघाडीकडून होऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com