राज्यसभेत लक्षणीय कामकाजाची नोंद, मराठी खासदार मराठीतून बोलण्यासाठी उदासीन...

राज्यसभेत लक्षणीय कामकाजाची नोंद, मराठी खासदार मराठीतून बोलण्यासाठी उदासीन...

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पूर्वार्धात राज्यसभेत 96 टक्के इतक्‍या लक्षणीय कामकाजाची नोंद झाली आहे. 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या काळातील निर्धारित 41 कामकाजी तासांपैकी 96 टक्के वेळ काम केले. त्याच वेळी गोंधळामुळे किमान साडेपाच तासांचे कामकाज ठप्प होण्याचेही प्रसंग आले. अधिवेशनाचा उत्तरार्ध 2 मार्चपासून सुरू होत आहे. 

राज्यसभा सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार अधिवेशनाच्या पूर्वार्धात 38 तास 30 मिनीटांचे कामकाज वरिष्ठ सभागृहाने केले. 5 तास 32 मिनीटे गोंधळामुळे पाण्यात गेले. त्याच वेळी राज्यसभेने सुमारे चार तास निर्धारित वेळेपेक्षा कामकाज केले. वर्षातील या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी मोदी सरकारने अलीकडे आणला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरू झालेल्या अधिवेशनात अभिभाषणावरील आभार दर्शक चर्चा व पंतप्रधानांचे चर्चेला उत्तर, वित्तीय समीक्षा अहवाल पटलावर मांडणे व 202-21 च्या केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चा व अर्थमंत्र्यांचे उत्तर हे कामकाज झाले. 

अभिभाषणावरील चर्चेत 45 व अर्थसंकल्पावरील चर्चेत 55 सदस्यांनी सहभाग नोंदविला. या काळात 155 म्हणजे 69 टक्के सदस्यांनी विविध विषयांवरील चर्चेत जनहिताचे विविध मुद्दे ुपस्थित केले. शून्य प्रहरात 75 तर विशेषोल्लेखांमध्ये 38 विषय संसदेच्या व्यासपीठावर मांडले गेले. प्रश्‍नोत्तर तासात 34 तारांकित प्रश्‍नांना संबंधित मंत्र्यांनी उत्तरे दिली. 

अर्थसंकल्पी अधिवेशनाचा उत्तरार्ध 2 मार्चपासून सुरू होईल. त्यात दिवाळखोरी कायदादुरूस्ती, तीन विमा कंपन्यांचे निर्गुतवणुकीकरण , राष्ट्रीय होमियोपॅथी आयोगाची स्थापना आदींसह किमान 20 विधेयके मंजूर करण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. 

संसदेत, विशेषतः राज्यसभेत सदस्यांनी आपापल्या मातृभाषेतून प्राधान्याने बोलावे अशी इच्छा उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती वेंकय्या नायडू यांनी वारंवार व्यक्त केली आहे. भारतीय भाषांच्या तत्काळ भाषांतरणाचा विभाग (एसआयएस) सुसज्ज करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. आपण स्वतः एक संपूर्ण दिवस आपली मातृभाषा तेलुगूमधून कामकाज चालविणार आहोत, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले होते. राज्यसभेत मातृभाषांतून बोलण्यामध्ये दक्षिणी राज्यांचे खासदार आघाडीवर आहेत. मात्र याआधी भरतकुमार राऊत व रजनी पाटील व सध्या अमर शंकर साबळे, हुसेन दलवाई वगळता अन्य मराठी खासदार अभावानेच मायबोलीत बोलतात. माजिद मेमन, वंदना चव्हाण, विनय सहस्त्रबुध्दे व अनिल देसाई अनेकदा अस्खलित इंग्रजीत बोलतात. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेच्या काव्यप्रतिभेलाही हिंदीतच "बहर आणि बहार' येते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com