एक्झिट पोलवर बंदी घाला : वळसे पाटील

राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत "एक्‍झिट पोल'चे अंदाज यापूर्वी आणि आता देखील खोटे ठरले आहेत, असे अंदाज प्रसारित करू नयेत. त्याचा परिणाम जनमतावर होतो. या संदर्भात निवडणूक आयोग किंवा सर्वोच्च न्यायालयाने योग्य ती कार्यवाही करण्याची गरज असल्याचे मतही दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केले.
एक्झिट पोलवर बंदी घाला : वळसे पाटील

मंचर : "शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहाही उमेदवार निवडून आणू व भगवा फडकवू, अशी वल्गना शिवसेनेच्या नेत्यांनी केली होती. पण, जनतेने शिवसेनेला नाकारले आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मताधिक्‍यात लक्षणीय वाढ झाली आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात जनतेने विकासकामांच्या बाजूने कौल दिला आहे,'' अशी प्रतिक्रिया आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विजयी उमेदवार दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केली.

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे निवडणूक निकालाचे प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते

वळसे-पाटील म्हणाले, ""ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, डॉ. कोल्हे, अमोल मिटकरी यांच्या सभांचा चांगला परिणाम झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामामुळे पक्षाला नेत्रदीपक यश मिळाले आहे. आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर, हडपसर या पाच मतदारसंघात पक्षाने यश मिळवले आहे. हीन पातळीवर वैयक्तिक टीका करणाऱ्यांना जनतेने चपराक दिली आहे.'' राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस संपली अशी भाषा वापरली जात होती. सत्तेवर आयुष्यभर आपणच राहू, असे कुणीही समजण्याची गरज नाही. भाजप-शिवसेना युतीच्या चुकीच्या धोरणांपासून जनतेला वाचविण्याचे काम आगामी काळात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

साताऱ्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाविषयी बोलताना ते म्हणाले, ""उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश जनतेला रुचला नाही. शरद पवार यांनी भर पावसात घेतलेली सभा व राष्ट्रवादी कॉंग्रेसने श्रीनिवास पाटील यांच्या सारख्या अनुभवी व राज्यपाल पद भूषविलेल्या उमेदवारास दिलेली उमेदवारी, पक्षासाठी जमेच्या बाजू ठरल्या.''

या निवडणुकीच्या ओपिनियन आणि एक्झिट पोलमध्ये सर्वच टिव्ही चॅनेलनी भाजप आणि शिवसेना युतीला दोनशेहून अधिक जागा मिळतील, असा दावा केला होता. तो पूर्णपणे खोटा ठरल्याचे वळसे पाटील यांनी या वेळी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com