चाणाक्ष राजू शेट्टींनी बदलते वारे ओळखले अन् काॅंग्रेसला खेळवले

भोळा चेहरा असलेले खासदार राजू शेट्टी राजकीयदृष्ट्या चाणाक्ष आहेत. काॅंग्रेससोबत जाण्याची घोषणा त्यांनी टिव्हीवर केली. पण लगेच तसे नसल्याचा खुलासाही केला. काॅंग्रेसलाही त्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पिछाडीवर असलेल्या काॅंग्रेसला शेट्टींशी युतीनंतर फायदा होण्याची आशा आहे. मात्र त्याबाबत लगेच स्पष्ट भूमिका न घेता शेट्टींनी सध्या तरी आपली खासदारकी सुरक्षित ठेवण्यासाठी पावले टाकली आहेत.
चाणाक्ष राजू शेट्टींनी बदलते वारे ओळखले अन् काॅंग्रेसला खेळवले

कोल्हापूर : कॉंग्रेस व त्यांच्या नेत्यांवर टीका करून स्वतःची खासदारकी शाबूत ठेवलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा कॉंग्रेसच्या गळ्यात गळा घालण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे लोकसभेतील स्वतःचा खुट्टा अधिक घट्ट करण्याचाच प्रकार आहे. श्री. शेट्टी यांच्या या बदलत्या भुमिकेचा जिल्ह्यात विधानसभेसाठी कॉंग्रेसलाही फायदा होणार आहे.

 
लोकसभेत श्री. शेट्टी कॉंग्रेससोबत राहीले आणि विधानसभेला दोन्ही कॉंग्रेसची आघाडी झाली तर विधानसभेच्या काही मतदार संघाची मागणी श्री. शेट्टी यांच्याकडून होण्याची शक्‍यता आहे. हातकणंगले लोकसभा व शिरोळ विधानसभेची जागा श्री. शेट्टी यांना सोडून इतर मतदारसंघातील श्री. शेट्टी यांच्या संघटनेची रसद मिळवून त्यावर स्वार होण्याचा कॉंग्रेस नेत्यांचा प्रयत्न असेल.

 काॅंग्रेसला फायदा

दिल्ली येथे श्री. शेट्टी यांनी काल कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली. यानंतर श्री. शेट्टी हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेससोबत राहणार अशा बातम्या पसरल्या. प्रत्यक्षात ज्या त्यावेळी राजकीय भूमिका ठरवून असे सांगत या बातमीचे खंडण श्री. शेट्टी यांनी स्वतः केले असले तरी भविष्यात ते भाजपाबरोबर जाण्याची सुतराम शक्‍यता नाही. त्यातून श्री. शेट्टी कॉंग्रेससोबत राहीले तर त्याचा फायदा कॉंग्रेसपेक्षा शेट्टी यांनाच जास्त होणार आहे.

शेट्टींविरोधात कोण?

श्री. शेट्टी यांनी भाजपाविरोधात गेल्या दोन-चार महिन्यात रान उठवल्याने सत्ताधारी असलेल्या या पक्षाला अंगावर घेतले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात 2019 च्या लोकसभेत वेगळी व्यूहरचना आखण्याचा प्रयत्न भाजपाचा प्रयत्न असेल. शिवसेना व भाजपाची लोकसभेला युती झाली तर हातकणंगले मतदार संघ भाजपाच्या वाट्याला आहे, तसे झाल्यास सद्यस्थिती भाजपाला तगडा उमेदवारच नाही. त्यातून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत किंवा "जनसुराज्य' चे संस्थापक विनय कोरे यांनाच मैदानात उतरण्याची तयारी भाजपाकडून सुरू होती. यातील श्री. खोत यांना उमेदवारी दिली तर श्री. शेट्टी यांना पुढे चाल दिल्यासारखेच होणार आहे. त्यामुळे शेट्टींना रोखण्यासाठी भाजपाला पहिल्यांदा तगड्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागेल.
 
श्री. शेट्टी यांनी २०१४ मध्ये भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचा जिल्ह्यात कॉंग्रेसला फटका बसला. शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगले, शाहुवाडी या त्यांचे प्राबल्य असलेल्या विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस भुईसपाट झाली. दोन्ही कॉंग्रेसच्या आघाडीत हातकणंगलेची जागा पहिल्यांदाच कॉंग्रेसला मिळाली पण ती जिंकता आली नाही. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत आठ उमेदवार उभे करूनही कॉंग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. वर्षभरापुर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतही श्री. शेट्टी यांचा पक्ष भाजपासोबत राहीला, या जोरावर भाजपाने जिल्हा परिषदेची सत्ता मिळवली. 

हातकणंगलेत टिकाव लागणार नसल्याने ही जागा श्री. शेट्टी यांना देऊन या मतदारसंघातील सहा विधानसभेचे मतदार संघ दोन्ही कॉंग्रेसकडून सुरक्षित करून घेतले जातील. या पाठिंब्यावर श्री. शेट्टी यांच्याकडूनही विधानसभेच्या काही जागांची मागणी होण्याची शक्‍यता आहे. त्यात शिरोळ, राधानगरी व चंदगडसाठी त्यांचा आग्रह असेल. एवढ्या जागा नसल्या तरी शिरोळ तरी त्यांच्यासाठी सोडावा लागेल. इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगलेत अजून कॉंग्रेसची ताकद आहे, त्याचा फायदा घेऊन लोकसभा जिंकायची व त्या बदल्यात कॉंग्रेसला सहकार्य करण्याची खेळी श्री. शेट्टी यांच्याकडून होण्याची शक्‍यता आहे. 

चाणाक्ष राजकारणी

कमी पैशात, कमी श्रमात कोणतेही संस्थात्मक किंवा रचनात्मक काम नसताना श्री. शेट्टी हे जिल्हा परिषद सदस्य असताना आमदार झाले, आमदार असताना खासदार झाले आणि दोन टर्म ते लोकसभेत गेले. राजकारणाचे वारे कसे फिरते त्यावर स्वार होण्याची कसब त्यांच्याकडे आहे. पाच वर्षात श्री. शेट्टी आपल्यासाठी भांडतात म्हटल्यावर त्यांना एकदा मत द्यायला काय हरकत आहे ही शेतकऱ्यांची भावना आहे. योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याचा चाणाक्षपणा त्यांच्याकडे आहे हे अलिकडच्या त्यांच्या बदलेलेल्या राजकीय भूमिकेवरून दिसून येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com