Bordikar to enter BJP on 6 may | Sarkarnama

रामप्रसाद बोर्डीकरांच्या भाजप प्रवेशाचा ‘सहा मे’ला मुहूर्त 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

गाडी रूळ बदलतांना खडखडाट होणारच... 
आपल्या पक्ष प्रवेशाबाबत जिल्ह्यातील काही नेत्यांचा विरोध आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर, सुरवातीला त्यांनी याबाबत बोलण्याचे टाळले पण नंतर या विषयी विचारले असता ते म्हणाले, रेल्वेने रूळ बदलल्यावर काही वेळेपुरता रुळाचा खडखडाट होतच असतो. 

परभणी : काॅँग्रेसमध्ये पक्ष संघटन व नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे केलेल्या कामाचे समाधान वाटत नाही. त्यामुळे आपण कॉँग्रेस सोडून भाजपमध्ये येत्या ता. सहा मे राेजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहोत, अशी माहिती काॅँग्रेसचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी मंगळवारी (ता. १८) दिली. 

सत्तेची कोणतीही महत्त्वकांक्षा न ठेवता मागील ३५ वर्षांपासून आपल्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आपण भाजप पक्षात प्रवेश करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शंकुतलाबाई बोर्डीकर महाविद्यालयात मंगळवारी (ता. १८) भाजप कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोर्डीकरांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ३५ वर्षांपासून आपण काँग्रेस पक्षात निष्ठेने काम केले. पक्ष संघटन आणि नेत्यांमध्ये आपसात समन्वय नसल्याने राज्यात काँग्रेस पक्षाची मोठी वाताहत झाली. कामाचे समाधान वाटत नसल्याने, कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याने राज्यात सत्तेत असलेल्या भाजप पक्षात प्रवेश करीत आहोत. 
येत्या ता. सहा मे रोजी केंद्रीय बांधकाममंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, राम शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहोत. या वेळी जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी, सरपंच, नगरसेवक भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत असेही त्यांनी सांगितले. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष विलास गीते, सुयोग्य मुंडे, गंगुबाई देशमुख, रमेश पालवे, मुसा कुरेशी, देशमुख, भगवान पालवे, सोपान देशमुख, प्रदीप फाले, मुन्ना पारवे, राजेश चव्हाण आदी उपस्थित होते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख