बोर्डीकरांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग खडतर

बोर्डीकरांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग खडतर

परभणी : कॉंग्रेसचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे सध्या भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरात सुरु झाली असतानाच परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर व सोनपेठ तालुक्‍यातून काही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भाजप प्रवेशाला कडाडून विरोध केला असल्याचे समोर आले आहे. बोर्डीकरांना भाजपमध्ये घेतल्यास आम्ही सोबत येणार नाही, असा पवित्रा या लोकप्रतिनिधींनी घेतल्याने बोर्डीकरांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग खडतर झाला आहे. 
परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांची व जिल्हा परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली. नगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेसचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्याकडे जिंतूर व सेलू येथील नगरपालिकेची जबाबदारी होती. परंतू या दोन्ही नगरपालिकेत कॉंग्रेसला सत्ता गाठता आलीच नाही. जिल्हा परिषद निवडणुकीत तर ग्रामीण भागातील मतदारांनी कॉंग्रेसला साफ नाकारले. दोन्ही तालुक्‍यात कॉंग्रेसला एकही जागा मिळाली नाही. यावरून या भागात माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून आले. 
दरम्यान, दोन्ही निवडणुका संपल्या आणि बोर्डीकरांनी भाजपच्या नेत्याशी संपर्क वाढवला. काही दिवसापूर्वी त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार कुंडलिकराव नागरे, आमदार व माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्यासह त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या कन्या मेघना साकोरे बोर्डीकर या देखील उपस्थित होत्या. त्यामुळे बोर्डीकर भाजपमध्ये जाणार याची चर्चा जोरात सुरू झाली. सोशल मिडियावरून मुख्यमंत्र्यासोबतचे त्यांचे फोटो झळकले. वर्तमानपत्रांमध्येही ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या दिला. 
स्वतः बोर्डीकरांनीही आपण लवकर भाजपमध्ये जाणार असल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगून या बातम्यांना दुजोरा दिला. जसे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर भाजपमध्ये जाणार हे जाहीर होताच त्यांच्या विरोधातील एक गट सक्रिय झाला. या गटात सेलू व सोनपेठ येथील काही लोकप्रतिनिधी आहेत. या लोकप्रतिनिधींनी भाजपशी अगोदरच भाजपशी संपर्क साधला होता. परंतु बोर्डीकर भाजपमध्ये जाणार हे समजल्यानंतर त्यांनी रामप्रसाद बोर्डीकर भाजप मध्ये येणार असतील तर आम्ही येणार नाही, असा पवित्रा घेतला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना त्याची कल्पना या मंडळींनी दिली आहे. दोन्ही तालुक्‍यातील लोकप्रतिनिधीच्या या भुमिकेनंतर भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली असून बोर्डीकरांना प्रवेश द्यायचा का नाही? यावर अद्यापही एकमत झाले नसल्याचे समजते. त्यामुळे बोर्डीकरांच्या भाजप प्रवेशाच्या अडचणी वाढल्या असल्याचे दिसून येत आहे. 
सध्या परभणी महापालिकेच्या निवडणुका सुरू असून बोर्डीकरांच्या येण्याने काही फायदा पक्षाला होणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. परभणी जिल्ह्यात माजी आमदार विजय गव्हाणे हे एक सोडले तर दुसरा मोठा नेता भाजपकडे नाही त्यामुळे बोर्डीकरांच्या रुपाने भाजपला परभणी जिल्ह्यात शिरकाव करता येईल. मात्र बोर्डीकर आले तर पक्षात आपली डाळ शिजणार नाही, असे काहींना वाटू लागले आहे. त्यामुळे त्यांनी आता बोर्डीकरांना विरोध सुरू केला आहे. शेवटी सत्ताधारी असलेल्या भाजपला भविष्यात पक्ष संघटन मजबूत करायचे असून आजी माजी आमदार व इतर लोकप्रतिनिधींना सोबत घेतल्याशिवाय ते शक्‍य होणार आहे, हे देखील ज्येष्ठ मंडळी जाणून आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com