" गांधीमय ' जागतिक पुस्तक प्रदर्शनात लाखोंची गर्दी !

मध्यवर्ती म्हणजेच थीम पॅव्हेलियनमध्ये गांधीजींवरील लघुपट कायम सुरू असतात. मिठाचा सत्याग्रह करण्यापूर्वी समुद्रस्नान करणारे, चरखा कातणारे, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद, सरोजिनी नायडू, विठ्ठलभाई पटेल आदींना काहीतरी "बजावणारे', गोलमेज परिषदेसाठी गेलेले, इटलीला भेट देणारे... गांधींजींच्या या विविध रूपांतील प्रत्यक्ष व दुर्मिळ चित्रीकरण येथे पहायला मिळते. गांधीजींवर विविध भाषांतील कार्यक्रम येथे सुरू आहेत.
 " गांधीमय ' जागतिक पुस्तक प्रदर्शनात लाखोंची गर्दी !

नवी दिल्ली : राजधानीतील प्रगती मैदान सध्या ओसंडून वहाते आहे... नॅशनल बुक ट्रस्टच्या जागतिक पुस्तक प्रदर्शनाला भेट देणाऱ्या लाखो ग्रंथरसिकांची गर्दी अकरा ते सहा अंश सेल्सिअसची थंडी आणि अवकाळी पावसालाही न जुमानता प्रगती मैदानाकडे येत आहे. जगभरातील 600 प्रकाशक, 56 भाषांमधील सुमारे सव्वा कोटी पुस्तकांचा हा मेळा यंदा राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे. "गांधी लेखकांचे लेखक' या नावामध्येच एक लेखक, प्रकाशक व संपादक म्हणून गांधीजींच्या व्यक्तिमत्वाचे वेगळे पैलू यानिमित्ताने उलगडला जात आहेत. मुख्य दालन वगळता मराठी पुस्तके व प्रकाशक मात्र भिंग घेऊनच शोधावी लागतात हेदेखील वास्तव आहे. 

प्रकाशकाची संख्या मात्र अगदीच कमी जाणवते. एनबीटी, साहित्य कादमी व विश्‍वकर्मा प्रकाशन या तीनच संस्थांच्या दालनात मराठीचे अस्तित्व जाणवते. एनबीटीचे गांधीजींवरील 56 मराठी पुस्तकांचे दालन आहे. मराठी प्रकाशक संघाने ही पुस्तके येथे मांडली आहेत. साने गुरूजींपासून गोविंद तळवलकरांपर्यंतच्या नामवंत लेखकांच्या गांधीजींवरील पुस्तके येथे आहेत. मराठी दालनात तीन विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. गांधीजींची पत्रकारिता, जनसंपर्क व त्यांच्या विचारांची प्रासंगिकता या विषयावरील पहिल्या परिवंसावादात वर्धा येथील गांधी विद्यापीठाचे बुध्ददास मिरगे, मिडीया वॉचचे अविनाश दुधे, राजीव दीक्षित ट्रस्टचे मदन दुबे आदींनी आपले विचार मांडले. 

महात्मा गांधी हे या शतकातील महानतम संवादक ठरले अशी भावना यावेळी व्यक्त झाली. श्रीकृष्ण काकडे यांच्या "भटके विमुक्त समाज ः भाषा व संस्कृती' या ग्रंथाचे प्रकाशन उद्या (ता. 8) शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर गांधीजींवरच आणखी एक परिसंवाद शनिवारी (ता. 11) होईल. 
प्रगती मैदानाच्या तोडफोडीचे अर्धवट काम व आकुंचन पावलेली दालने असूनही ग्रंथरसिकांचा पुस्तके पाहण्याचा व खरेदी करण्याचा उत्साह दांडगा दिसत आहे. सकाळी अकरा ते रात्री आठ अशी ग्रंथखरेदीची वेळ असली तरी रात्री दहापर्यंत अनेक स्टॉल्सवरील गर्दी कायम असते. सारेच लोक ग्रंथखरेदी करत नाहीत व हौशे, नवसे आणि गवसे यांचीही जत्रा येथे भरली आहे हे मान्य केले तरी मोबाईलच्या जमान्यात पंजाबी गुरूबाणीपासून मराठीतील गांधींवरचा परिसंवाद ऐकण्यासाठीची उपस्थिती लक्षणीय असते हे वास्तव आहे. 

मध्यवर्ती म्हणजेच थीम पॅव्हेलियनमध्ये गांधीजींवरील लघुपट कायम सुरू असतात. मिठाचा सत्याग्रह करण्यापूर्वी समुद्रस्नान करणारे, चरखा कातणारे, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद, सरोजिनी नायडू, विठ्ठलभाई पटेल आदींना काहीतरी "बजावणारे', गोलमेज परिषदेसाठी गेलेले, इटलीला भेट देणारे... गांधींजींच्या या विविध रूपांतील प्रत्यक्ष व दुर्मिळ चित्रीकरण येथे पहायला मिळते. गांधीजींवर विविध भाषांतील कार्यक्रम येथे सुरू आहेत. 

फ्रेंच, जर्मनी, रशिया, स्पेन, इराण, संयुक्त अरब अमिराती आदी देशांतील प्रकाशक येथे आले आहेत. ओरिएन्टल, हार्पर कोलिन्स, पेंग्विन आदी नामवंत प्रकाशक आहेत. आवारात शिरल्याशिरल्या इस्लामिक कल्चरल सेंटरची मुले इस्लाम धर्माची महती सांगणाऱ्या पुस्तिका विनामूल्य तुमच्या हाती ठेवतात आणि बाराव्या दालनात क्र. 83 चा स्ट्रॉल आमचा आहे हेही सांगतात सर्वच धर्मांच्या पुस्तकांचीे दालने येथे गर्दी खेचताना दिसतात. यंदा पहिल्या चार दिवसांतच कोट्यवधींची ग्रंथविक्री झाल्याचे नॅशनल बुक ट्रस्टकडून सांगण्यात येते. पण निश्‍चित आकडा तुम्हाला अखेरच्या दिवशी रात्री मिळेल, असे "सरकारीछाप' उत्तरही पाठोपाठ येतेच. यंदा सर्वाधिक विक्री इंग्रजी व हिंदी पुस्तकांची होत आहे. हिंदी, इंग्रजी कादंबऱ्या अनेक ठिकाणी 100 रूपयांत दोन ते तीन याप्रमाणे मिळतात. काही स्टॉल्स फक्त जुन्या व दुर्मिळ पुस्तकांचे आहेत. 

चौहान यांच्याकडून मराठी पुस्तकांची विचारणा... 
दिल्लीपर्यंतचा खर्च आणि होणारी विक्री याचा ताळमेळ बसत नसल्याने मराठी प्रकाशकांना येथे येण्यात फारसे स्वारस्य नसल्याचे सांगितले जाते. दुसरे म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि एनबीटीचे हे प्रदर्शन यांच्या तारखा आसपासच्याच येतात हा दरवर्षीचा अनुभव आहे. स्वाभाविकपणे दिल्लीसारख्या परक्‍या ठिकाणापेक्षा महाराष्ट्रातच ग्रंथविक्री करणे प्रकाशकांना अधिक सोयीस्कर होते असे सांगितले जाते. मराठी दालनांची संख्या कमी असली तरी रसिकांचे लक्ष मराठी पुस्तकांकडे जातेच. मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रदर्शनाला भेट दिली तेव्हा त्यांनी चटकन एक मराठी पुस्तक हाती घेऊन मराठीच्या सहायक संपादिका निवेदिता मदाने यांना विचारले की बापूजी के उप्पर मराठीमे कितनी किताबे है ? 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com