bmc election | Sarkarnama

भाजपचा गटनेता मराठी की अमराठी ?

महेश पांचाळ : सरकारनामा न्यूजब्युरो
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

मुंबई महापालिकेत भाजपकडून कोणाला गटनेता करायचा यावरुन पक्षात खल सुरू आहे. ज्येष्ठतेनुसार भाजपचे नगरसेवक मनोज कोटक, डॉ. राम बारोट यांची नावे आघाडीवर आहेत. अमराठी कोटक यांची निवड केली तर भाजप हा गुजरातींचा पक्ष असल्याचा प्रचार होण्याची शक्‍यता अधिक असल्याने, नेता निवडीची प्रक्रिया लांबणीवर टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 

मुंबई : मुंबई महापालिकेत भाजपकडून कोणाला गटनेता करायचा यावरुन पक्षात खल सुरू आहे. ज्येष्ठतेनुसार भाजपचे नगरसेवक मनोज कोटक, डॉ. राम बारोट यांची नावे आघाडीवर आहेत. अमराठी कोटक यांची निवड केली तर भाजप हा गुजरातींचा पक्ष असल्याचा प्रचार होण्याची शक्‍यता अधिक असल्याने, नेता निवडीची प्रक्रिया लांबणीवर टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणती भूमिका घ्यायची यावरून भाजपच्या दिल्ली नेतृत्वाशी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सल्लामसलत केल्याचे समजते. दरम्यान, मुंबईत आपलाच महापौर असेल असा दावा करणाऱ्या शिवसेनेने एक पाऊल पुढे टाकले असून, 84 सेना नगरसेवक आणि अन्य 4 अपक्ष अशा 88 जणांच्या गटांची नोंदणी मंगळवारी कोकण आयुक्तालयात केली. तसेच शिवसेनेने यशवंत जाधव यांची गटनेते पदी निवड करून सत्तास्थापनेबाबत शिवसेना कशी आग्रही आहे हे दाखवून दिले आहे.

सुरवातीला महापौर हा भाजपचा होईल, असे मुंबई अध्यक्ष ऍड. आशिष शेलार यांनी निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. चार अपक्षांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावाही केला होता. परंतु शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या मुंबईच्या महापौरपदावर सेनेचा उमेदवार निवडून आला नाही तर त्याचे राज्याच्या राजकारणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भाजपने मुंबईच्या महापौर पदाचा हट्ट करू नये, असा मानणारा एक गट भाजपमध्ये आहे. त्यामुळे भाजपमध्ये महापौरांवरुन स्वतंत्र मतप्रवाह असल्याचे दिसून आले आहे.

84 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला मुंबईतील मराठी माणसांनी मोठ्या संख्येने साथ दिली तर 82 जागा मिळविणाऱ्या भाजपच्या पाठीशी गुजराती, मारवाडी, जैन समाज उभा राहिल्याचे मतांचे आकडे आता पुढे येत आहेत. मुंबई भाजप अध्यक्षपदी ऍड. आशिष शेलार यांचा मराठी चेहरा असला तरी, महापालिकेत आता भाजप आणि शिवसेना या वादाला मराठी विरुद्ध गुजराती असे स्वरूप येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मुंबई महापालिकेत गुजराती, जैन समाजातील उमेदवाराला गटनेता किंवा महत्त्वाचे पद दिल्यास, भाजपाविरोधात महाराष्ट्रात संदेश देण्याचे काम सेनेकडून केले जाऊ शकतो.त्यामुळे नक्की कोणाला महत्त्वाच्या पदावर बसवायचे यावरही आता भाजपच्या थिंक टॅंकमध्ये चर्चा सुरू असल्याचे समजते. यामुळे भाजपचे ज्येष्ठ मराठी नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्या नावाचा महत्त्वाच्या पदासाठी विचार केला जाण्याची शक्‍यता आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख