bmc | Sarkarnama

मुंबई पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाची नेमणुक लांबणीवर 

कुणाल जाधव 
गुरुवार, 9 मार्च 2017

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहोपौरपदाची निवडणुक निर्विघ्नपणे पार पडली. यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत स्थायी समितीसह विविध समित्यांच्या सदस्यांच्या नावाची घोषणाही झाली. पण कायदेशीर "पेच' निर्माण झाल्याने सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा अद्याप करण्यात आलेली
नाही.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहोपौरपदाची निवडणुक निर्विघ्नपणे पार पडली. यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत स्थायी समितीसह विविध समित्यांच्या सदस्यांच्या नावाची घोषणाही झाली. पण कायदेशीर "पेच' निर्माण झाल्याने सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा अद्याप करण्यात आलेली
नाही. त्यामुळे या पदावर दावा करणारे कॉंग्रेसचे गटनेते रवी राजा काहीसे खट्टू झाले आहेत. 

शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीत अखेर शिवसेनेने बाजी मारली आहे. भाजपने केलेल्या मतदानामुळे शिवसेनेचे
विश्‍वनाथ महाडेश्‍वर महापौर पदावर तर हेमांगी वरळीकर या उपमहापौरपदावर निवडले गेले आहेत. या निवडणुकीसाठी बोलविण्यात आलेल्या पालिकेच्या विशेष
सर्वसाधारण सभेमध्ये स्थायी समितीसह पालिकेच्या विविध वैधानिक समित्यांच्या सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र, वैधानिकदृष्या महत्वाचे असलेले
विरोधी पक्षनेते पद अद्यापही रिक्त ठेवण्यात आले आहे. पालिका निवडणुकीत एकूण 84 जागांवर विजय संपादन करणारी शिवसेना पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळेच
महापौरपदावर दावा करण्यासाठी सेनेला आपले बहुमत सिद्ध करण्याची संधी मिळाली. 

या निवडणुकीत 82 नगरसेवक निवडून आलेला भाजप हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. भाजपने महापौर आणि उपमहापौरपदासाठी शिवसेनेला पाठिंबा दिला असला
तरीही आपण कोणत्याही प्रकारे पालिकेच्या सत्तेत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सत्तेत सहभाग नसल्याने दुसऱ्या क्रमांकावार असलेल्या भाजपला
विरोधी पक्षनेते पद बहाल केले जाऊ शकते. मात्र, विरोधी पक्षनेतेपद घेणार नसल्याची भुमिका मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केल्याने विरोधी पक्षनेतेपदासाठी
भाजपकडून कोणतेही नाव पुढे करण्यात आलेले नाही. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कॉंग्रेस पक्षाला विरोधी पक्षनेतेपदाची "लॉटरी' लागू शकते. मात्र, या
विचित्र परिस्थितीत नेमका काय निर्णय घ्यायचा याबाबत पालिकेच्या चिटणीस कार्यलयातही स्पष्टता नाही. म्हणूनच याबाबतचे कायदेशीर मत विधी विभागाकडून
मागविले जाणार आहे. या कायदेशारी पेचामुळे कॉंग्रेसचे गटनेते रवी राजा यांना विरोधी पक्षनेतेपदाठी 17 तारखेला होणाऱ्या सर्वसाधारण सभेची वाट पहावी
लागणार आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख