blow for ganesh naik before election in navi mumbai | Sarkarnama

गणेश नाईकांना निवडणुकीआधीच नवी मुंबईत दणका

सुजित गायकवाड
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

..

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीच्या आधीच भाजपला एकामागोमाग एक धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. आमदार गणेश नाईक यांचे खंदेसमर्थक असणारे डझनभर आजी-माजी नगरसेवक महाविकास आघाडीच्या मार्गावर आहेत.

तुर्भेतील सुरेश कुलकर्णी पाठोपाठ माजी नगरसेवक डी. आर पाटील यांच्या घरातील नगरसेवक, सीबीडी-बेलापूर मधील नगरसेवक, वाशीतुन माजी नगरसेवक विक्रम शिंदे आणि दारावे गावातील सुतार दाम्पत्य मविआतील शिवसेना आणि राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या बेतात आहेत. यापैकी काही नगरसेवकांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचे समजते. 

एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांतर्फ़े मविआचा प्रयोग केला जाणार आहे. महापालिका निवडणुकीदरम्यान मविआचे नेते मंडळी नवी मुंबईतच ठाण मांडून बसणार असल्याने ही निवडणूक मविआकडून प्रतिष्ठेची होणार आहे. त्यामुळे विधानसभा दरम्यान नवी मुंबईत नुकताच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या गणेश नाईकांना कडवे आव्हान उभे राहिले आहे.

कधीकाळी वेगवेगळे लढणाऱ्या या पक्षांमुळे मतविभाजन होऊन नाईकांचे नगरसेवक निवडून येत होते. मात्र आता तिन्ही पक्ष एकत्र आल्याने मत विभाजन होण्याची शक्यता कमी आहे. खुद्द नाईकांनी पक्ष बदलल्यामुळे मुस्लिम आणि पश्चिम महाराष्ट्रातील मते नाईकांच्या नावावर मिळण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. तुर्भे नाका, तुर्भे स्टोअर, सिवूडस दारावे, सीबीडी बेलापूर मधील दलित मते भाजपला मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे या परिस्थितीत नगरसेवक धोका पत्करण्याच्या मनःस्थितीत नाहीत. तसेच नगरसेवकांना थांबवण्याच्या बाबतीत भाजपकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. उलट ज्यांना जायचे आहे त्यांनी आताच खुशाल जावे अशा अवेशातील वागणूक नगरसेवकांना मिळत आहेत.

त्यामुळे काही दिवसांपूर्वी तुर्भेतील नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी त्यांच्या मुलाच्या नावावर शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत हळदी-कुंकवाचा भव्य सोहळा करून शिवसेना प्रवेशाचे थेट संकेत नाईकांना दिले आहेत. तसेच त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचेही समजते आहेत. त्यांच्या पाठोपाठ तुर्भेतील पाटील घराण्यातील नगरसेवकही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी मुंबईतील कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच वाशीत काँग्रेस मधून नाईकांसोबत भाजप मध्ये गेलेल्या नगरसेवकांनी प्रभागावर दावा केल्यामुळे शिंदे यांच्या उमेदवारी संकटात सापडल्याने ते सुद्धा राष्ट्रवादीचा मार्ग पत्करतील अशी चर्चा वाशीत रंगली आहे. तर दारावेतील सुतार नगरसेवकही राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे फोटो ही समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. परंतु अद्याप कुठे ही न जाण्याचे निश्चित नसल्याचे सुतार यांनी स्पष्ट केले आहे.

कोंग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची घर वापसी 
आमदार गणेश नाईक यांच्यासोबत भाजपात गेलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांची घर वापसी होणार आहे. नगरसेवक अंकुश सोनवणे आणि नगरसेविका हेमांगी सोनवणे यांनी काही दिवसांतच भाजपशी फारकत घेऊन   पुन्हा काँग्रेसशी सूट जुळवले. तर त्यांच्या प्रमाणे वाशीतील नगरसेवकांना गळाला लावण्याचा काँग्रेसच्या पक्ष श्रेष्टींकडून प्रयत्न सुरू आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख